“कथाकारांनी विश्व जाणिवेचे आव्हान पेलावे!” – डॉ. श्रीपाल सबनीस


राज्यस्तरीय कथालेखन कार्यशाळा संपन्न



पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – “कथाकारांनी विश्व जाणिवेचे आव्हान पेलावे!” असे आवाहन ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत डॉ. श्रीपाल सबनीस यांनी भाविसा सभागृह, भावे हायस्कूलमागे, सदाशिव पेठ, पुणे येथे केले. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ तसेच साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था – पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या एकदिवसीय राज्यस्तरीय कथालेखन कार्यशाळेचे उद्घाटन करताना डॉ. श्रीपाल सबनीस बोलत होते. ज्येष्ठ साहित्यिक विलास सिंदगीकर अध्यक्षस्थानी होते. ज्येष्ठ साहित्यिक सोपान खुडे, बबन पोतदार, साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था – पुणेचे अध्यक्ष डॉ. दीपक चांदणे यांची यावेळी व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.

डॉ. श्रीपाल सबनीस पुढे म्हणाले की, “जागतिक मानवी स्वभावाचे वास्तव गुंतागुंतीचे आहे. त्यातील वेदना आणि विद्रोह यांचे सम्यक आकलन झाल्याशिवाय विश्वाचे आर्त पचवून अभिजात दर्जाचे वाड्.मय निर्माण होणार नाही. कथालेखन कार्यशाळेतून श्रेष्ठ कथाकार निर्माण होतील!” अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. सोपान खुडे यांनी कथेची सुरगाठ, निरगाठ आणि उकल ही प्रक्रिया विशद करून, “आपली कथा आधी आपल्यालाच आवडली पाहिजे!” असे मत मांडले. विलास सिंदगीकर यांनी अध्यक्षीय मनोगतातून, “‘सत्यम् शिवम् सुंदरम्’ हे कथेचे सूत्र आहे. कथाकार निर्भीड असला पाहिजे. एखाद्या भुकेलेल्या माणसाप्रमाणे त्याचे वाचन हवे; तरच त्याची कथानिर्मिती सशक्त होईल!” असे प्रतिपादन केले.
भोजनोत्तर ‘कथालेखनाचे तंत्र’ या दुसर्या सत्रात ज्येष्ठ साहित्यिक बबन पोतदार यांच्या अध्यक्षतेखाली कथालेखिका प्रा. डॉ. कीर्ती मुळीक यांनी कथेचा प्रारंभ, कथाविस्तार, मांडणी आणि शेवट याची शास्त्रशुद्ध पद्धत कथन केली. कथालेखिका नीलिमा बोरवणकर यांनी कथेतील काळ, परिस्थिती आणि जागा यानुसार व्यक्तिरेखा कशा रेखाटाव्यात याचे तंत्र विशद केले. बबन पोतदार यांनी सत्राच्या अध्यक्षीय मनोगतातून कथाबीज कसे असावे, कसे शोधावे आणि कसे फुलवावे याबाबत मार्गदर्शन केले.
‘कथालेखनाचे घटक आणि लेखकाची अभिव्यक्ती’ या विषयावरील तिसऱ्या सत्रात ज्येष्ठ साहित्यिक प्रा. तुकाराम पाटील यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. धनंजय भिसे यांनी कथा समाजजीवनावर कसा परिणाम करते याविषयी ऊहापोह केला; तर प्रा. तुकाराम पाटील यांनी कथेची नाळ आशयाशी जोडलेली असावी, अशी अपेक्षा व्यक्त करून, “कथा बोधप्रद असावी!” असे मत व्यक्त केले.
विलास सिंदगीकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि साहित्यिक वि. दा. पिंगळे आणि साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था – पुणेच्या सचिव अस्मिता चांदणे यांच्या प्रमुख उपस्थितीत समारोप सत्रात कथालेखन तंत्र आणि मंत्र याबाबत सविस्तर मंथन करण्यात आले. अर्चना कदम यांनी सूत्रसंचालन केले. राजेंद्र वाघ यांनी आभार मानले.








