आमदार शंकर जगताप यांच्या हस्ते ‘पवनाथडी’ जत्रेचे उदघाटन


पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – शहरातील महिला बचत गटांना सक्षम करण्यामध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा वाटा महत्वपूर्ण असून देश सक्षमीकरण करताना महिलांचे सक्षमीकरण करणे देखील गरजेचे आहे असे प्रतिपादन आमदार शंकर जगताप यांनी केले.



पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयोजित ‘पवनाथडी’ जत्रेचे उदघाटन आमदार शंकर जगताप यांच्या हस्ते आणि आमदार उमा खापरे यांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलन करून करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.

या कार्यक्रमास अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, माजी महापौर उषा उर्फ माई ढोरे, आमदार आण्णा बनसोडे यांच्या पत्नी प्रिया बनसोडे, माजी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, माजी नगरसदस्य राजेंद्र राजापुरे,सागर आंघोळकर, धनराज बिर्दा,माजी नगरसदस्या माई काटे, सविता खुळे,उषा मुंढे, चंदा लोखंडे, शमीम पठाण, समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त तानाजी नरळे, जनसंपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक,कार्यकारी अभियंता सतीश वाघमारे, दिलीप धुमाळ,दिव्यांग भवन फाउंडेशन चे मुख्य कार्यकारी अधिकारी परेश गांधी,कार्यालय अधिक्षक अनिता बाविसकर, तसे सामाजिक कार्यकर्ते यांच्यासह विविध महिला बचत गटांतील महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार शंकर जगताप म्हणाले की, पिंपरी चिंचवड महापालिकेने जास्तीत जास्त महिलांच्या सक्षमीकरणासाठी तरतूदीत वाढ करून प्रयत्न करावेत,शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी पवनाथडी जत्रेचे आयोजन करावे असे सांगून त्यांनी पवनाथडी जत्रेतील स्टॉलधारकांना शुभेच्छाही दिल्या.
आपल्या शहरातील महिला सुगरणी आहेत त्यामुळे त्यांच्या खाद्य पदार्थांना पवनाथडीच्या माध्यमातून स्टाॅल्स उपलब्ध करून दिले जातात. शहरातील बाकी महिला बचत गटांना आर्थिक सक्षम करण्यासाठी असेच स्टॉल्स महापालिकेने चिंचवडकरांसाठीही उपलब्ध करून द्यावे अशी मागणी आमदार उमा खापरे यांनी केली.
यावेळी बोलताना अतिरिक्त प्रदीप जांभळे पाटील म्हणाले की पवनाथडी जत्रेत यंदा स्टॉलची संख्या वाढविण्यात आली आहेत. यामध्ये दिव्यांग, तृतीयपंथी यांना देखील स्टॉल वाटप करण्यात आले आहे. महापालिकेचे अधिकारी आपल्या कुटुंबासह या कार्यक्रमात सहभागी होत असतात असे सांगून शहरातील नागरिकांनी देखील महिला बचत गटांनी बनविलेल्या वस्तू खरेदी करण्यासाठी,तयार केलेल्या विविध खाद्यपदार्थाची मेजवानी करण्यासाठी पवनाथडी जत्रेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहनही त्यांनी केले.
या उद्घाटन कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक आयुक्त तानाजी नरळे यांनी केले. सूत्रसंचालन प्रफुल्ल पुराणिक आणि विकास गायकांबळे, ओंकार जाधव, पौर्णिमा भोर, विजया सोळंके यांनी केले तर समाज विकास विभागाच्या प्रशासन अधिकारी पूजा दूधनाळे यांनी आभार व्यक्त केले.
यानंतर सुरु झालेल्या “महाराष्ट्राची गौरव धारा” या कार्यक्रमाला देखील नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद देत आनंद अनुभवला.
चौकट –
पिंपरी चिंचवड महानगरपालिका पालिकेच्या समाज विकास विभागाच्या वतीने महिलांच्या सक्षमीकरणासाठी दरवर्षी पवनाथडी जत्रा सांगवी येथील पीडब्लूडी मैदान येथे भरविण्यात येते. यंदा देखील याच मैदानावर पवनाथडी जत्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या जत्रेत ७५० हुन अधिक स्टॉल लावण्यात आले असून यामध्ये महिला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तू विक्रीसाठी ठेवण्यात येतात. महाराष्ट्रातील खाद्य संस्कृती चव देणारे पदार्थ येथील स्टॉलवर महिलांनी ठेवलेले असतात. या सोबतच येथे येणाऱ्या नागरिकांचे मनोरंजन करण्यासाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात आले आहे. पुढील चार दिवस या जत्रेत महिलांनी तयार केलेली उत्पादने, विविध खाद्य पदार्थ, विक्रीसाठी असणार आहेत. तसेच सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये महाराष्ट्राची गौरवधारा , मेरा भारत महान, जागर स्त्री शक्तीचा सुर गृहलक्ष्मीचा, जगत सुंदरी असे विविध कार्यक्रम होणार आहेत.








