जनसंवाद यात्रेदरम्यान नागरिकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांबाबत आमदार सुनील शेळके यांची जिल्हाधिकारी यांच्यासोबत बैठक


जनसंवाद यात्रेदरम्यान नागरिकांनी उपस्थित केलेल्या अडचणींवर सखोल चर्चा



मावळ, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या सोबत मावळचे आमदार सुनील शेळके यांनी तालुक्यातील प्रलंबित कामांबाबत बैठक घेतली या बैठकीत प्रामुख्याने मागील आठवड्यातील लोणावळा व खंडाळा परिसरात जनसंवाद यात्रेदरम्यान नागरिकांनी उपस्थित केलेल्या अडचणींवर सखोल अशी चर्चा करण्यात आली.

लोणावळा शहरातील भांगरवाडी – नांगरगाव दरम्यान रखडलेल्या उड्डाणपुलाचे काम मार्गी लावणेसाठी एक महिन्यांच्या आत मोजणी करून भुसंपादन प्रक्रिया पूर्ण करण्यात यावी, त्याचप्रमाणे ठेकेदाराने १५ मार्च २०२५ पूर्वी पुलाचे काम तातडीने चालू करण्याबाबत आदेश देखील देण्यात आले. तसेच लोणावळा शहरातील महात्मा फुले भाजी मंडईचे काम हे नगरपरिषदेच्या निधीतून करणेबाबत पुढील कार्यवाहीबाबत व इतर आवश्यक बाबींसाठी व्यापारी बांधवांशी चर्चा करण्याबाबत नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांना प्रामुख्याने सूचना आमदार सुनील शेळके व जिल्हाधिकारी यांनी दिल्या.
रामनगर येथील गायरान जागा घरकुलांसाठी उपलब्ध होणेसाठी नवीन कन्सल्टंट नेमून लवकरात लवकर कार्यवाही करण्यात यावी खंडाळा तलावाशेजारील गेल्या अनेक वर्षांपासून राहत असलेल्या बांधवांना नवीन घरे बांधून देण्याबाबत तसेच त्यांच्या इतर मुलभूत गरजांबाबत सकारात्मक चर्चा यावेळी झाली. त्याचप्रमाणे खंडाळा येथील माध्यमिक शाळेच्या इमारतीसाठी प्रस्तावित जागेची भूसंपादन प्रक्रिया तात्काळ करण्याबाबत नगरपरिषद प्रशासनास सूचना देखील देण्यात आल्या .
लोणावळा शहरात नवीन स्वस्त धान्य दुकान परवाने सुरु करण्यात येऊन नागरिकांना चांगल्या दर्जाचे धान्य मिळणेबाबत मागणी देखील जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली त्याचप्रमाणे मावळ तालुक्यात पात्र शिधापत्रिका धारकांना स्वस्त धान्य उपलब्ध होणेसाठी इष्टांक वाढवून मिळणे, इंदोरी येथील शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा लाभ मिळावा, रिंगरोड बाधित शेतकऱ्यांच्या अडचणी, देहू शहरातील ग्रामीण रुग्णालय व घनकचरा व्यवस्थापन यांसाठी गायरान जागेची मागणी अशा विविध विषयांवर सकारात्मक बैठक पार पडली.








