ताज्या घडामोडीपिंपरी

सर्वसामान्यांच्या भाषेला सामावून घेतल्यास मराठीला अधिक समृद्धी – डॉ.तारा भवाळकर

Spread the love

दिल्ली, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)- मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला हे अभिमानास्पद असून मराठीचा वापर- व्यवहार सर्व स्तरांत व सर्वदूर वाढला पाहिजे. प्रमाण लेखनाइतकीच बोलीभाषाही महत्वाची आहे. त्यामुळे सर्वसामान्य माणसांच्या भाषेला सामावून घेतले तरच आपली भाषा अधिकाधिक समृद्ध होईल, असे प्रतिपादन ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष डॉ. तारा भवाळकर यांनी आज येथे केले.   

नवी दिल्लीच्या तालकटोरा स्टेडियम मध्ये उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराज साहित्यनगरीत  अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाच्या दुसऱ्या सत्रात त्या बोलत होत्या. कार्यक्रमाला माजी केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे, संमेलनाचे स्वागताध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार,  मावळते अध्यक्ष डॉ.रवींद्र शोभणे, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा प्रा.उषा तांबे, कार्यवाह डॉ. उज्ज्वला मेहेंदळे , कोषाध्यक्ष प्रकाश पागे,  संमेलनाचे निमंत्रक संजय नहार आदी उपस्थित होते.

डॉ.भवाळकर म्हणाल्या, मराठी भाषेची संमेलने आयोजित करतांना. मराठी लिहिणारी, बोलणारी, मराठीत व्यवहार करणरी माणसे वाढणे आणि ग्रामीण आणि सीमावर्ती भागात मराठी भाषेला पुढे नेण्याचे प्रयत्न करणाऱ्या लेखक, कवी, प्रकाशकांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे, मराठी भाषा शिक्षणातून कमी होत चालली आहे.  मराठी भाषेच्या विकासासाठी दहावीपर्यंतचे शिक्षण मराठीतूनच व्हावे. इंग्रजी माध्यमातून मराठीचे शिक्षण देतांना उच्च मराठीची पुस्तकेच शिकवावी.  मराठी भाषेचा विस्तार होण्यासाठी सर्वांनी कृतीशील होण्याची  आणि तिला वैश्विकतेकडे नेतांना  आपणही विशालतेच्या भावनेने  समावेशकतेचे सूत्र स्विकारण्याची आवश्यकता आहे, असे त्यांनी सांगितले.

साहित्य संमेलन सुरू झाल्यानंतर ते विशिष्ट वर्गाचे संमेलन असल्याचे नमूद करून त्या म्हणाल्या, आज संमेलनाची व्याप्ती विस्तारते आहे.  मराठी भाषेचा विकासात  शिक्षण न घेतलेल्या, परंपरेने शहाणपण आलेल्यांनीदेखील महत्वाचे  योगदान दिले आहे. साक्षरतेच्या जोडीला शहाणपण नसेल तर साक्षरतेचा उपयोग नाही. पुस्तकापेक्षा संत कवींनी, पारंपरिक शिक्षण न घेतलेल्या महिला कवयित्रींनी जास्त ज्ञान दिले आहे.

भाषा समाजातील सर्व परंपरा , लोकव्यवहार आणि विचारांची वाहक असते.  लोककलेत  नृत्य, गाणी, नाट्य, संगीत, कला, वाद्य, कथा असते,  एखादी देवता यांच्याशी लोककला जोडलेली असते. जीवनाचं समग्र आकलन लोककलेसोबत  प्रत्यक्ष लोकजीवनात असतं. लोकजीवनातील सर्व साधनं मिळून लोकसाहित्य बनते. लोकसाहित्यात या सगळ्याचा अविष्कार होतांना दिसतो.

लोककलेतील गीतांचा उपयोग सामाजिक चळवळींसाठी मोठ्या प्रमाणात झाला. स्वातंत्र्यपूर्व काळात जात्यावरची ओवी गाणारी स्त्री राजकीयदृष्ट्याही जागरूक होती. भोवतालच्या वातावरणातून आलेलं शहाणपण हे लोकपरंपरेतून मोठ्या प्रमाणात होतं, म्हणून कामगार चळवळीतून आलेली मंडळी मोठ्या प्रमाणात लेखक-कवी झाले. त्यातून लोकसंस्कृतीकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला. लोकसंस्कृतीत आदीम काळापासून आजपर्यंतचा प्रवाह दिसतो.

डॉ.शोभणे म्हणाले,  मराठी भाषेचा प्रवास गेल्या अडीच हजार वर्षापासून अव्याहतपणे सुरू आहे आणि पुढेही असाच जोमाने सुरू राहणार आहे. बृहन्महाराष्ट्रातील विविध साहित्य संस्था मराठी भाषेच्या विकासासाठी विशेष प्रयत्न करीत आहेत. या साहित्य संस्थांमध्ये वावरणारी नवी पिढीदेखील आस्थेने काम करीत आहे. अशा साहित्यिक संस्थांना शासनाकडून आर्थिक पाठबळ मिळाल्यास  या प्रयत्नांना बळ मिळेल. नव्या मंडळीच्या मनात साहित्याविषयी गोडी निर्माण करण्याचे कार्य जुन्या मंडळींनी करणे आवश्यक आहे. या संदर्भात शासनाची भूमिका अत्यंत सकारात्मक आहे. मराठी भाषा विभागाची स्थापना करून त्या माध्यमातून मराठीच्या विकासाचे चांगले कार्य करण्यात येत आहे. विश्व संमेलनाच्या निमित्ताने जगातील मराठी माणसांना एकत्र आणण्याचे कार्य झाले असल्याचे सांगून त्यांनी राज्य शासनाला धन्यवाद दिले.

अध्यक्षपदाची सूत्रे नूतन अध्यक्षांकडे सोपवितांना कृतार्थतेची भावना असल्याचे नमूद करून डॉ.शोभणे म्हणाले,  मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतरचे हे संमेलन असल्याने त्याला महत्व आहे, हा योग अतिशय महत्वाचा आहे. आजच्या मराठी साहित्य विश्वाला तर्कनिष्ठ आणि वैज्ञानीक दृष्टी देणारे साहित्यिक म्हणून तर्कतिर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्याकडे पाहिले जाते. त्यांच्या अध्यक्षतेखाली 1954 मध्ये दिल्लीत साहित्य संमेलन झाले होते.  त्याच पायवाटेवरून पुढे जाणाऱ्या आणि संशोधनाच्या क्षेत्रात आपला ठसा उमटविणाऱ्या  डॉ.तारा भवाळकर अध्यक्ष झाल्या आहेत.  साहित्य संमेलनाच्या माध्यमातून  सकारात्मक ऊर्जा देण्याचे आणि त्यासाठी पायवाट निर्माण करण्याचे कार्य होते, असे डॉ.शोभणे म्हणाले.

यावेळी ९७ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ.रवींद्र शोभणे यांनी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची सूत्रे डॉ.भवाळकर यांच्याकडे सोपविले. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे वार्षिक  ‘अक्षरयात्रा-मराठी साहित्यिकांचे समाजभान’ चे प्रकाशन डॉ.भवाळकर यांच्या हस्ते करण्यात आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button