ठाण मांडलेल्या अधिकाऱ्यांना दे धक्का ‘पीएमआरडीए’ आयुक्तांची दुसऱ्या दिवशीही कारवाई


पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामध्ये (पीएमआरडीए) प्रतिनियुक्तीवर वर्षानुवर्षे चिकटून बसलेल्या अधिकाऱ्यांची उचलबांगडी सुरू करण्यात आली आहे. सलग दुसऱ्या दिवशीही आणखी दोन अधिकाऱ्यांना शासनाच्या मूळ जागी पाठविण्याची कार्यवाही आयुक्त योगेश म्हसे यांनी केली आहे. नागरिकांच्या तक्रारी आणि नगर रचना विभागामध्ये सुरू असलेल्या अनियमित कामांमुळे आयुक्तांनी दोन दिवसात चार जणांना कार्यमुक्त केले आहे. राहुल दिवेकर (कनिष्ठ रचना सहाय्यक) आणि विवेक डुब्बेवार (शाखा अभियंता) या दोघांना तत्काळ कार्यमुक्त केले.



नगररचना विभागामध्ये बांधकाम नोंदणी त्याचप्रमाणे विविध परवानगी दिली जाते. नागरिकांची कामे होत नसल्याबाबत यापूर्वीच आयुक्तांकडे तक्रारी दाखल झाल्या होत्या. त्यानुसार आयुक्तांनी याबाबतची माहिती मागवली होती. त्यामध्ये एकमेव नगररचना विभागामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी असलेले अधिकारी हे पाच ते सात वर्षापासून एकाच ठिकाणी असल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार ही कारवाई मोहीम हाती घेतली आहे. यापैकी दिवेकर यांची पीएमआरडीएमध्ये २०१७ मध्ये नोव्हेंबरच्या कालावधीत शासनाकडून प्रतिनियुक्तीवर रुजू झाले होते. २०२० मध्ये त्यांचा कार्यकाळ पूर्ण झाला होता. मात्र, त्यांनी राज्य शासनाकडून पुन्हा नोव्हेंबर २०२३ अखेरपर्यंत मुदतवाढ घेतली. डिसेंबरमध्ये त्यांना कार्यमुक्त करण्यात आले होते. सलग सहा वर्ष काम करून देखील ते पुन्हा जून २०२४ मध्ये ‘पीएमआरडीए’त आहे त्याच जागेवर रुजू झाले. ही बाब निदर्शनास आल्यानंतर आयुक्तांनी तत्काळ त्यांना मूळ जागी नवी मुंबई येथील नगरपरिषद संचनालय येथे पाठविले. तर, डूब्बेवार हे मार्च २०१८ मध्ये प्रतिनियुक्तीवर रुजू झाले होते. तीन वर्षांनी म्हणजेच २०२१ मध्ये त्यांचा कार्यकाल संपला. त्यानंतर त्यांनी याच पदावर पुन्हा शासनाकडून तीन वर्षांची मुदतवाढ घेतली होती. त्यानंतर मार्च २०२४ मध्ये कार्यमुक्त केले होते. मात्र अवघ्या तीन महिन्यानंतर पुन्हा नव्याने ऑर्डर आणून रुजू झाले. त्यानंतर आज त्यांना कार्यमुक्त केले आहे. त्यांच्या मूळ जागी म्हणजेच नगरविकास विभाग येथे पाठवण्यात आले.









