ताज्या घडामोडीपिंपरी

साहित्य ही महाराष्ट्राची संस्कृती – उदय सामंत

साहित्ययात्री संमेलनाची इंग्लडच्या ग्लोबल बुक ऑफ द एक्सलन्समध्ये नोंद

Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – बाराशे साहित्यिक व साहित्यप्रेमी एकत्र येऊन संमेलनानिमित्त प्रवास करणे हा जागतिक विक्रम आहे. चार साहित्यिक एकत्र आल्यावर चांगले विचार ऐकायला मिळतात. साहित्य आणि साहित्यिक म्हणजे महाराष्ट्राची संस्कृती आहे. या संस्कृतीची जपणूक या संमेलनानिमित्ताने होत आहे, असे प्रतिपादन मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी केले.

सरहद, पुणे आणि अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळातर्फे दिल्ली येथे ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या निमित्त मराठी साहित्ययात्री संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. पुणे ते दिल्ली प्रवासादरम्यान हे प्रवासी साहित्य संमेलन होत आहे. या संमेलनाचे उद्घाटन आज (दि.१९) मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी डॉ. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील, साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ साहित्यिका डॉ. संगीता बर्वे, ग्लोबल बुक ऑफ एक्सलन्स, इंग्लडचे उपाध्यक्ष डॉ. दीपक हरके उपस्थित होते.

यावेळी शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यात आले. राष्ट्रगीत आणि महाराष्ट्र गीताच्या सादरीकरणाने रेल्वे स्टेशन परिसर दुमदुमून गेला होता. पंढरपूर येथून आलेल्या ग्रंथ दिंडीचे या वेळी स्वागत करण्यात आले. ही दिंडी रेल्वेद्वारे दिल्लीला जाणार आहे. या मराठी साहित्ययात्री संमेलनादरम्यान उदय सामंत यांनी रेल्वेतून प्रवास करत साहित्यिक, साहित्यप्रेमी आणि पत्रकारांशी संवाद साधला.

मराठी साहित्ययात्री संमेलनाचे अध्यक्ष शरद तांदळे, कार्यकारी अध्यक्ष वैभव वाघ, कार्याध्यक्ष शरद गोरे, कार्यवाह सचिन जामगे, मुख्य समन्वयक ॲड. अनिश पाडेकर, सोमनाथ चोथे, गणेश बेंद्रे, निमंत्रक अक्षय बिक्कड उपस्थित होते.
यावेळी उदय सामंत यांनी सांगितले की, या विशेष रेल्वेला महान सेनानी महादजी शिंदे यांचे नाव दिले हे अभिमानास्पद आहे. महाराष्ट्रातील नागरिक छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्या विचारांचा आदर करणारे आहेत. या संमेलनाच्या निमित्ताने मराठी भाषेला सातासमुद्रापलिकडे नेण्याचे मोठे कार्य घडत आहे.
डॉ. पी. डी. पाटील म्हणाले, मराठी भाषा साहित्य संमेलन हे साहित्य आणि संस्कृतीची गौरवशाली परंपरा आहे.
या संमेलनाच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज यांनी महाराष्ट्राला दिलेली शौर्याची शिकवण पुढे नेणाऱ्या पराक्रमी सेनानी महादजी शिंदे यांना वंदन केले जात आहे.
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित कवी केदारनाथ सिंह यांच्या ‌‘केदारनाथ सिंह की पचास कविताएं‌’ या कविता संग्रहाचा साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त साहित्यिका डॉ. संगीता बर्वे यांनी मराठीत केलेल्या ‌‘सर्जनात्मक हस्तक्षेप‌’ या अनुवादीत पुस्तकाचे मंत्री उदय सामंत आणि डॉ. पी. डी. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

पुणे ते दिल्ली प्रवासादरम्यान रेल्वेत होणाऱ्या मराठी साहित्ययात्री संमेलनाची ग्लोबल बुक ऑफ द एक्सलन्स, इंग्लड मध्ये नोंद करण्यात आली असून ग्लोबल बुक ऑफ एक्सलन्स, इंग्लडचे उपाध्यक्ष डॉ. दीपक हरके यांनी आज रेल्वे स्थानकावर झालेल्या उद्घाटन समारंभात राज्याचे मराठी भाषा मंत्री उदय सामंत व संयोजकांना याविषयीचे प्रमाणपत्र प्रदान केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button