देशाच्या आर्थिक विकासासाठी युवकांनी पुढे यावे – डॉ. आनंद गोविंदालुरी


पीसीईटी आणि सिंगापूर येथील गोविंद होल्डिंग्स यांच्यामध्ये शैक्षणिक सामंजस्य करार



पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – भारतातील स्टार्टअप्स, एमएसएमई उद्योगांना जागतिक पातळीवरती प्रचंड संधी आहेत. याचा फायदा घेण्यासाठी युवकांनी औद्योगिक विकासाची कास धरावी. यामुळे अनेक रोजगार निर्माण होतील. भारताची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन तर महाराष्ट्राची अर्थव्यवस्था तीन ट्रिलियन डॉलर होण्यासाठी चाकोरी बाहेरच्या कल्पनांना मूर्त स्वरूप देत रोजगार निर्मिती करावी. त्यामुळेच देशाच्या आणि राज्याच्या आर्थिक विकासाला गती मिळेल असे प्रतिपादन गोविंद होल्डिंग्स सिंगापूरचे संस्थापक संचालक आणि समूह कार्यकारी अधिकारी डॉ. आनंद गोविंदालुरी यांनी केले.

आधुनिक विज्ञान – तंत्रज्ञानाचा वापर औद्योगिक, व्यावसायिक क्षेत्रात वाढत आहे. महाराष्ट्रातील नव उद्योजक, व्यावसायिक, स्टार्टअप्स यांना जागतिक पातळीवरील नव्या बदलांची माहिती व्हावी. तसेच या क्षेत्रातील तज्ज्ञांशी चर्चा, संवाद साधता यावा या उद्देशाने पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीईटी) संचलित पिंपरी चिंचवड विद्यापीठ (पीसीयु), गर्जे मराठी ग्लोबल, महाराष्ट्र इकॉनॉमिक डेव्हलपमेंट कौन्सिल यांच्या संयुक्त विद्यमाने बालेवाडी येथे ‘ग्लोबल एंटरप्रेन्युअर्स कॉन्क्लेव्ह २०२५’चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट आणि गोविंद होल्डिंग्स, सिंगापूर यांच्यामध्ये शैक्षणिक सामंजस्य करार करण्यात आला. पीसीईटीच्या वतीने कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी आणि या करारावर गोविंद होल्डिंग च्या वतीने डॉ. गोविंदालुरी यांनी सह्या केल्या. यावेळी ॲक्शन अगेन्स हंगर फ्रान्सचे ग्लोबल चेअरमन अश्विनी कक्कर, स्टॅटर्जी अँड डेव्हलपमेंट फिनलँडचे हेरंब कुलकर्णी, ट्रेड इंडिया डॉट कॉम चे सीईओ संदीप छेत्री, डीआयसीसीआयचे मिलिंद कांबळे, फाईव्ह एफ डिजिटलचे अध्यक्ष गणेश नटराजन, बीव्हीजीचे संस्थापक अध्यक्ष हनुमंत गायकवाड, राजेंद्र जगदाळे, मकरंद फडके सी.ए. वृषभ पारक, दुबई वीज आणि जल प्राधिकरण चे व्यवस्थापक सोमनाथ पाटील, समीर वाघ, डॉ. सानिध पाटील, गर्जे मराठी ग्लोबलचे संस्थापक अध्यक्ष आनंद गानू, एमएडीसीचे उपाध्यक्ष सचिन इटकर, गर्जे मराठी ग्लोबलचे संचालक विनय तळेले, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर आदी उपस्थित होते.
या शैक्षणिक करारामुळे विद्यार्थी, प्राध्यापकांना जागतिक स्तरावरील उच्च दर्जाचे शिक्षण तसेच उद्योग जगतातील तांत्रिक आणि आर्थिक विषयक माहिती मिळणार आहे. पीसीईटी गुणवत्तापूर्ण दर्जेदार आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर अभ्यासक्रमामध्ये करत आहे. अल्पावधीतच पीसीईटीने आंतरराष्ट्रीय स्तरावर दर्जेदार शिक्षण देणारी संस्था म्हणून नावलौकिक प्राप्त केला असून जगातील ३३ पेक्षा अधिक विद्यापीठे, संस्था यांच्याबरोबर शैक्षणिक सामंजस्य करार केले आहेत, असे डॉ. गिरीश देसाई यांनी सांगितले.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्मा भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त तथा पीसीयुचे कुलपती हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.








