सर्जनशीलतेला वाव म्हणजे ‘वार्षिक अंक ‘ -प्रो. डॉ. प्रभाकर देसाई
रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले महाविद्यालयात ‘शाल्मली’ वार्षिक अंकाचा प्रकाशन समारंभ संपन्न झाला.
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – महाविद्यालयातील तरुणांनी सजग राहिले पाहिजे. स्पर्धेच्या या युगात आपण सक्षम बणून काळाची आव्हाने पेलण्यासाठी सज्ज राहिले पाहिजे. मोबाईलचा अतिवापर टाळून वाचन संस्कृतीवर भर दिला पाहिजे. समाजजीवन, समाजजीवनातील स्थित्यंतरे समजून घेऊन आपणास अभिव्यक्त होता आले पाहिजे. महाविद्यालयीन जीवनात महाविद्यालयातून दरवर्षी प्रकाशित होणारा वार्षिक अंक आपल्या सर्जनशीलतेला, नवनिर्मितीला वाव मिळवून देणारे असे महत्त्वपूर्ण माध्यम आहे, त्याचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा व आपल्या विचाराला चालना द्यावी असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आंतरविद्याशाखा अधिष्ठाता प्रो. (डॉ.) प्रभाकर देसाई यांनी केले.
रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले महाविद्यालयात ‘शाल्मली’ वार्षिक अंकाचा प्रकाशन समारंभ संपन्न झाला.त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास प्राध्यापक, शिक्षकेतर सेवक व विद्यार्थी उपस्थित होते.
पुढे ते म्हणाले की, पारंपरिक शिक्षणात बदल होऊन नवीन शैक्षणिक धोरण आले आहे. या धोरणात अध्ययनात विशिष्ट शाखेचे पारंपरिक बंधन असणार नाही. एकाच वेळी आपण ज्या शाखेत प्रवेश घेतलेला आहे त्यासोबत दुसऱ्या शाखेतील आपल्या आवडीचा विषय घेऊन आपणास अध्ययन करता येणार आहे, त्याचा लाभ घ्यावा. रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले महाविद्यालयामार्फत प्रकाशित होणाऱ्या ‘शाल्मली’ वार्षिक अंकाच्या प्रकाशन समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी उपप्राचार्य प्रा. शहाजी मोरे होते. महाविद्यालयाचा ‘वार्षिक अंक’ हा विद्यार्थ्यांना व्यक्त होण्याचे हक्काचे व्यासपीठ आहे, त्यातून अधिकाधिक विद्यार्थ्यांनी व्यक्त व्हावे असे आवाहन त्यांनी केले.
वार्षिक अंकातून कथा, कविता, निबंध, वैचारिक लेखन, व्यक्तिचित्रे, नवनवे शास्त्रीय शोध, राजकारण, अर्थकारण, शिक्षण, संस्कृती अशा विविध पातळ्यांवरील लेखन समाविष्ट केले जाते. विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीच्या विषयावर लेखन करून आपल्या विचारायला चालना द्यावी असा मनोदय प्राचार्य प्रो. (डॉ.) माधव सरोदे यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संपादक डॉ. वैशाली खेडकर यांनी केले. उपस्थितांचे आभार प्रा. स्वप्ना हजारे यांनी मानले. सूत्रसंचालन प्रो. (डॉ.) कामायनी सुर्वे यांनी केले.