पिंपरी चिंचवड साहित्य मंच आयोजित *मुशाफिरी- द्वितीय सत्र* भाग २ – रंगरंगीला राजस्थान-जयपूर ; लेखन माधुरी शिवाजी विधाटे
गुलाबी रंगाच्या विविध छटा लेऊन सजलेली जयपूर नगरी म्हणजे जणू काही भरजरी गुलाबी शालू नेसलेली रुपगर्विताच भासते.’ पधारो म्हारो देस ‘ असे सांगणाऱ्या रंगरंगील्या राजस्थानची ही राजधानी पिंक सिटी म्हणजेच गुलाबी शहर म्हणून ओळखले जाते. महाराजा सवाई जयसिंग यांनी वसवलेली ही सुंदर नगरी प्रिन्स ऑफ वेल्सच्या स्वागतासाठी गुलाबी रंगाच्या विविध छटांमध्ये रंगवण्यात आली, तेव्हापासून तिला पिंक सिटी म्हणून ओळखतात. नगराचे सुनियोजन, कला स्थापत्याचा सुरेख संगम आणि पारंपारिक स्थानिक विविधतेची जपणूक या वैशिष्ट्यांच्या आधारावर या शहराचा समावेश युनेस्कोने जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये केला आहे.
सुंदर राजप्रसाद, भव्य किल्ले, आल्हाददायक बागबगीचे, विस्तीर्ण जलाशय, कलाकुसरीने नटलेल्या हवेल्या, अशी जयपुर नगरी पाहण्याचा खूप दिवसांचा मानस पाच वर्षांपूर्वी पूर्ण झाला. येथील सर्व इमारती, दुकाने, घरे, मंदिरे आणि राजवाड्यांच्या एकसारख्या गुलाबी दर्शनी भागाने मन मोहून घेतले.
जयपूरचे महाराजा जयसिंग द्वितीय यांच्या सिटी पॅलेस या भव्य राजवाड्याला प्रथम भेट दिली. सुंदर कोरीवकाम केलेल्या संगमरवरी दोन गजराजांनी प्रवेशद्वारावर स्वागत केले. भव्य प्रांगणातील लाल गुलाबी रंगातील अतिशय सुंदर राजवाड्याचे कमानदार गवाक्ष, नाजूक कलाकुसर केलेल्या भिंती, स्तंभ आणि छत तसेच छतावरील हंड्या झुंबरांची नेत्रसुखद मेजवानी मिळाली. या राजवाड्याच्या काही भागाचे चित्र दालन आणि संग्रहालयात रूपांतर केले आहे. येथील राजामहाराजांच्या वस्त्र प्रावरणांचे भांडार आणि आकर्षक जडावकाम केलेल्या तलवारी व शस्त्राचे भांडार, मखमली गालीचे, सुंदर लघुचित्रे, गंगाजली नावाचे चांदीचे दोन मोठे कलश हे बघताना वेळ कसा गेला हे समजलेच नाही. येथील सातमजली चंद्र महालात महाराजांच्या शाही परिवाराचे निवासस्थान होते.
मुबारक महाल, दिवाणे आम, महाराणी पॅलेस, गोविंद देवजी मंदिर महाराजांची सौंदर्यदृष्टी, कलाप्रेम, संस्कृतिप्रियता आणि शौर्यगाथा सांगत आहेत असे वाटले.
तिथून मानसागर सरोवरात मधोमध डौलाने उभा राहिलेला जलमहाल पाहिला. एखादी देखणी जलपरी जलाशयातून बाहेर यावी अशा या मोहक रूपाने मन वेधून घेतले. जलाशयाच्या मध्यभागी असल्यामुळे याला आयबॉल म्हणतात. महाराजा जयसिंग द्वितीय यांनी आपल्या राणी वशासाठी याची निर्मिती केली आहे. या पाच मजली वास्तूचे चार मजले पाण्यात असून वरील एकच मजला दृष्टीला पडला. येथे प्रत्यक्ष प्रवेश करायला बंदी असल्यामुळे तीरावरून दर्शन घेतले. राजस्थानी व मोगल स्थापत्यकलेचा संगम असलेल्या या महालाचे गवाक्ष कमानदार महिरपींनी सजले होते. जलाशयाच्या पाठीमागे अरवली पर्वतरांगा, महालाच्या छतावरील हिरवी वनराई , महालाचे देखणे घुमट व मेघडंबरी या पार्श्वभूमीवर पाखरे भिरभिरत होती. मोठ्या प्रमाणावर स्थलांतरित पक्षी येत असल्याने पक्षी निरीक्षणासाठी हे अतिशय उत्तम स्थळ आहे. संध्याकाळच्या सोन उन्हात महालाचे जललहरींवर हेलकावणारे प्रतिबिंब अतिशय सुरेख दिसत होते. रात्री सुंदर रोषणाईने उजळलेला जलमहाल तर किती सुंदर दिसत असेल असे वाटले. महालातील विविध दालनांमध्ये मनमोहक रंगसंगतीतील सुंदर चित्रे आहेत असे समजले. तीरावर राजस्थानी पारंपारिक कलाकुसरीच्या वस्तू, पर्सेस, मोजडी, हस्तिदंती वस्तू, लाखेच्या रंगीबेरंगी सुंदर बांगड्या, कंगण आकर्षकरित्या मांडले होते. मग बांगड्यांची मनसोक्त खरेदी केली. अशा मनमोहक वातावरणात राजस्थानी पारंपारिक पोशाख आणि आभूषणे घालून छायाचित्र काढण्याचा मोह कुणाला बरं आवडेल? ते रंगीत छायाचित्र जेव्हा लगेच हातात मिळाले, तेव्हा आनंदाने मन भरून गेले.