चिंचवडताज्या घडामोडी

चिंचवडगावात निवडणूक विभागाकडूनच आचारसंहितेचे उल्लंघन

Spread the love

 

मतदान केंद्राच्या आवारातच भाजपची भिंतीवर रंगवलेली जाहिरात ठरली अपवाद

निवडणूक विभागावरच थेट पोलिसांनी खटला दाखल करावा

शिवसेनेच्या संतोष सौंदणकरांची मागणी

चिंचवड (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – चिंचवडगावातील मतदान केंद्राच्या अगदी जवळच असणाऱ्या भाजपच्या जाहिरातीमुळे निवडणूक विभागाच्या पारदर्शक कारभाराचा नमुना पुन्हा एकदा समोर आला आहे. त्यामुळे निवडणूक आयोग अजूनही धृतराष्ट्राच्याच भूमिकेत असण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. मतदानाच्या दिवशीच हा प्रकार निदर्शनास आल्यामुळे निवडणूक विभागाकडून आचारसंहितेचा भंग झाला आहे. त्यामुळे निवडणूक विभागावर पोलिसांनी थेट खटला दाखल करावा, अशी मागणी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे चिंचवडचे शहर संघटक संतोष सौंदणकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.

पत्रकात सौदणकर यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील प्रचारतोफा सोमवारी सायंकाळी थंडावल्या. त्यानंतर आज बुधवारी (दि. २०) रोजी पिंपरी, चिंचवड, भोसरी मतदार संघात मतदान प्रक्रिया पार पडली. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या जाहिराती चौकाचौकांत आणि महत्त्वाच्या रस्त्यावर लावण्यात आल्या होत्या. प्रचाराची मुदत संपल्यानंतर त्या उमेदवाराने स्वखर्चाने काढून घ्यायच्या असतात. अथवा महापलिका आणि निवडणूक आयोगाने त्यावर कारवाई करायची असते. परंतु, चिंचवड विधानसभा मतदार संघातील चिंचवड गावातील पवनानगर येथील जैन फत्तेचंद शाळा येथील मतदान केंद्राच्या आवारातच भाजपची भिंतीवर रंगवलेली जाहिरात याला अपवाद ठरली आहे.

पवनानगर येथील जैन फत्तेचंद शाळा हे मतदान केंद्र पोलिसांच्या हद्दीपासून शंभर मीटर अंतरावर आहे. त्यापासून केवळ पन्नास मीटर आत असणाऱ्या एका भिंतीवर भाजपची ही जाहिरात रंगविण्यात आली आहे. त्यावर भाजपचे निवडणूक चिन्ह आणि ‘पुन्हा एकदा भाजपा सरकार’ असा मजकूर रंगविण्यात आला आहे. इतर पक्षांच्या जाहिराती तत्परतेने हटविणाऱ्या निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांना ही जाहिरात कशी दिसली नाही. मुळात भाजपचे बूथ केंद्र जाहिरातीच्या अगदीच जवळ आहे. त्यामुळे आचारसंहितेचा भंग झाला आहे. निवडणूक विभागाने जाणूनबुजून या बाबीकडे दुर्लक्ष केले? त्यामुळे पोलिसांनीच निवडणूक आयोगाच्या जबाबदार अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा, असे या पत्रकात संतोष सौंदणकर यांनी म्हटले आहे.

”राज्यात २० नोव्हेंबर २०२४ रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी सोमवार, दि. १८ नोव्हेंबर २०२४ रोजी संध्याकाळी ६ वाजल्यापासून शांतता कालावधी सुरू झाला आहे. मतदान संपेपर्यंतच्या ४८ तासांमध्ये, लोकप्रतिनिधित्व कायदा १९५१ च्या कलम १२६ अंतर्गत मतदारांवर प्रभाव टाकणाऱ्या प्रचारास मनाई आहे. या अटींचे उल्लंघन झाल्यास दोन वर्षापर्यंत तुरुंगवास अथवा दंड अथवा दोन्ही अशा शिक्षेची तरतूद आहे. मग ही कारवाई स्वतःवरच करायची की जाहिरात रंगविणाऱ्या पक्षावर करायची? याचा फैसला खुद्द निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी करावा.”
मा. संतोष सौंदणकर, चिंचवड शहर संघटक – शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button