प्रमिला कुलकर्णी यांनी वयाच्या ८५ व्या वर्षी केले मतदान
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – चिंचवड गावातील ज्येष्ठ नागरिक प्रमिला सदाशिव कुलकर्णी यांनी वयाच्या ८५ व्या वर्षी पिंपरी, काळेवाडी येथील मनपा शाळा क्रमांक ५६/२ येथे मतदान करून राष्ट्रीय कर्तव्य पार पाडले.
प्रमिला कुलकर्णी यांनी माध्यम प्रतिनिधीशी बोलताना सांगितले की, मी आतापर्यंत महानगरपालिका, विधानसभा व लोकसभा निवडणुकीत प्रत्येक वेळी आवर्जून मतदान केले आहे. तसेच विवाहपूर्वी माझ्या माहेरी केळवडे ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद निवडणूकित देखील मतदान केले आहे. आज वयाच्या ८५ व्या वर्षी याचे समाधान वाटते की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखे दूरदृष्टीचे नेतृत्व सलग तीन वेळा पंतप्रधानपद भूषवित आहेत. तसेच महाराष्ट्राला अग्रेसर ठेवण्याची भूमिका घेणारे देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्री पदाचा कार्यकाल देखील उल्लेखनीय आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोट्यावधी हिंदू बांधवांचे राम मंदिर पूर्ण करण्याचे स्वप्न पूर्ण केले आणि प्रत्यक्ष अयोध्येत जाऊन राम मंदिराचे दर्शन घेण्याचे भाग्य लाभल्याचे प्रमिला कुलकर्णी यांनी सांगितले. तसेच माझे पती सदाशिव कुलकर्णी हे त्यांच्या तरुण वयापासून जनसंघाचे काम करीत होते. पक्ष कार्य करीत असताना अनेकदा त्यांनी स्वतःच्या तब्येतीकडे तसेच वेळप्रसंगी कुटुंबाकडे देखील दुर्लक्ष केले. परंतु पक्षाने दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली. त्यांचाच आदर्श डोळ्यापुढे ठेवून चिरंजीव महेश गेली ४५ वर्षे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पार्टीचे काम करीत आहे. परंतु खंत याची वाटते की, भारतीय जनता पार्टीचे सरकार दोन वेळा राज्यात स्थापन झाले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत आमदार लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे यांच्या नेतृत्वाखाली पाच वर्ष भाजपला सत्ता मिळाली. परंतु महेश कुलकर्णी सारख्या पक्ष कार्यासाठी वाहून घेतलेल्या कार्यकर्त्याकडे लक्ष देण्यास भाजपच्या राज्यातील शीर्षस्थ नेत्यांना वेळ मिळाला नाही, असेच दुर्लक्ष स्थानिक नेतृत्वाने देखील महेश कुलकर्णी कडे केल्याचे वाईट वाटते.