आठ महिन्यांपूर्वी उभारलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळतोच कसा ? निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्यावर कठोर कारवाईची छावा मराठा संघटनेची मागणी
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – आठ महिन्यापूर्वी मोठा गाजावाजा करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलेला मालवण (जि. सिंधुदुर्ग) येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याची घटना दुर्दैवी आहे. काम सुरु असतानाच स्थानिक लोकांनी या पुतळ्याच्या कामासंदर्भात केलेल्या तक्रारीची दखल का घेतली गेली नाही ? छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या कामातही भ्रष्टाचार करणाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी छावा मराठा संघटनेचे पुणे जिल्हाप्रमुख रामभाऊ जाधव यांनी केली आहे.
छावा मराठा संघटनेचे पुणे जिल्हाप्रमुख रामभाऊ जाधव यांनी एक शिवप्रेमी म्हणून तीव्र निषेध करतो, अशा शब्दात संताप व्यक्त केला. रामभाऊ जाधव यांनी सांगितले, की काम सुरु असतानाच स्थानिक लोकांनी या पुतळ्याच्या कामासंदर्भात केलेल्या तक्रारीची दखल का घेतली गेली नाही ? हा शिवकालीन किल्ला आजही मजबूत आहे. मग आठ महिन्यांपूर्वी उभारलेला पुतळा कसा काय कोसळू शकतो. प्रसिध्दीसाठी कामाच्या दर्जाकडे अक्षम्य दुर्लक्ष केले आहे. एकीकडे समुद्रात स्मारक उभे करण्याची घोषणा झाली. जलपूजनही झाले. सात वर्षे उलटूनही आजतागायत पुढे काहीही झाले नाही. मात्र, केवळ उद्घाटन उरकण्याच्या अट्टाहसापायी काम घाईघाईत उरकण्यात आले. त्यामुळे या कामाची तातडीने चौकशी होऊन दोषींवर कडक कारवाई झालीच पाहिजे.
ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी भर समुद्रात, मोठमोठ्या शिखरावर अभेद्य किल्ले बांधले, त्यांचा पुतळा अवघ्या आठ महिन्यात कोसळणे दुर्दैवी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा लोकसभा निवडणुकीसाठी वापर करायचा होता. त्यामुळेच घाईघाईत काम उरकून पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले, असा आरोपही रामभाऊ जाधव यांनी केला.