हातगाडीधारकांचे कुटुंबीयांना १० लाख अर्थसहाय्य द्यावे – काशिनाथ नखाते
पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – डेक्कन जिमखाना पुणे येथील झेड ब्रिजच्या खाली असलेल्या सुकांता लेन हॉकर्स झोन येथे पुराच्या पाण्यातून हातगाडी काढताना घडलेल्या दुर्घटनेत३ हातगाडी धारकांचा मृत्यू झाला ही घटना दुर्दैवी असून मृतांच्या नातेवाईकांना शासनाने प्रत्येकी १० लाख रुपये अर्थसाह्य द्यावे व महानगरपालिकेच्या आपत्कालीन विभाग कार्यान्वित करून अशा घटना टाळाव्यात अशी मागणी आज कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी केली.
पुणे झेड फ्रीज खाली असलेल्या हॉकर झोनच्या ठिकाणी मोठा पुर आला आणि या पुरात आपली हातगाडी वाहून जाईल म्हणून अभिषेक घाणेकर, आकाश माने आणि शिवा परिहार हे हातगाडी काढण्यासाठी गेले असता विजेचा धक्का लागून त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला या दुर्दैवी घडलेल्या घटनास्थळाची आज महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते यांनी पाहणी करून घटनेची माहिती घेतली यावेळी पथ विक्रेता एकता समितीचे अध्यक्ष दिपक मोहिते ,राजेश माने ,सलीम डांगे उपस्थित होते. सदरच्या ठिकाणी फुगे विक्री करणारे विक्रेते यांचीही तात्पुरती घरे आहेत पाण्यामुळे त्यांचेही नुकसान होऊन स्थलांतर झालेले असून त्यांनाही भेट दिली. अनेक संघर्षानंतर हॉकर झोन मिळाले आणि ते मिळाल्यानंतरही दुर्दैवाने अशी स्थिती निर्माण झाली अत्यंत उमद्या वयामध्ये २१ ते २५ वय गट असणाऱ्या विक्रेत्या युवकांचा मृत्यू झाल्याने सदरच्या परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मुख्यमंत्र्यांनी या घटनेत लक्ष देऊन मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दहा लाख रुपये अर्थसाह्य द्यावे आणि अशा प्रकारच्या घटना घडणार नाहीत याबाबत पुणे महानगरपालिका व इतर महापालिकांना आदेश देऊन अशा घटना रोखण्यात याव्यात अशी मागणी ही नखाते यांनी केले आहे.