शहरातील सर्व पोलीस स्टेशनचे कामकाज लवकरच नेहरूनगर न्यायालयात वर्ग होणार! – भाजपा आमदार महेश लांडगे यांचा पाठपुरावा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सकारात्मक प्रतिसाद


पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय कार्यक्षेत्रातील हिंजवडी, रावेत, दिघी, देहूरोड, भोसरी आणि वाकड या पोलिस ठाण्यांचे संपूर्ण कामकाज लवकरच नेहरूनगर न्यायालयात वर्ग होणार आहे. या निर्णयासाठी आमदार महेश लांडगे आणि पिंपरी-चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशन यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या पाठपुराव्याला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सकारात्मक प्रतिसाद मिळालेला आहे.



आमदार महेश लांडगे, पिंपरी-चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. गौरव वाळुंज, ॲड मंगेश खराबे ,सचिव रीना मगदूम ,ॲड खंदारे, ॲड कोकणे यांनी मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांची नुकतेच शहरातील विविध विकास कामांच्या उद्घाटनानिमित्ताने आले असता आमदार महेश लांडगे यांच्यामाध्यमातून भेट घेतली व निवेदन दिले. यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी लवकरच पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व पोलिस ठाण्यांचे कामकाज नेहरूनगर न्यायालयात वर्ग करण्यासंबंधी आश्वस्त केले.

पूर्वी पिंपरी-चिंचवड शहरातील न्यायप्रविष्ठ बाबी मोरवाडी न्यायालयातून चालत होत्या, मात्र आता नेहरूनगर येथील अण्णासाहेब मगर स्टेडियम समोरील नवीन सुसज्ज इमारतीमध्ये न्यायालय स्थलांतरित झाले आहे. याठिकाणी १० न्यायाधीशांची नेमणूक केली गेली आहे आणि लवकरच २ नवीन दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) आणि न्यायदंडाधिकारी (प्रथम वर्ग न्यायालय) यांची नियुक्ती होणार आहे.
सध्या हिंजवडी, देहुरोड, भोसरी आणि वाकड पोलिस स्टेशनचे कामकाज पुणे, खडकी आणि वडगाव मावळ न्यायालयात चालते. यामुळे नागरिकांचा वेळ आणि पैसा वाचविण्यासाठी तसेच न्यायालयीन प्रक्रिया सोयीस्कर होण्यासाठी नेहरूनगर न्यायालयात हे कामकाज वर्ग करणे अत्यंत आवश्यक आहे. यामुळे नागरिकांच्या प्रवासाचा वेळ कमी होईल आणि प्रशासनाच्या कामकाजामध्ये गती येईल.
“पिंपरी-चिंचवड शहरातील हिंजवडी, रावेत, दिघी, देहूरोड, भोसरी, वाकड या पोलिस स्टेशनचे काही कामकाज सध्या पुणे, खडकी व वडगाव न्यायालयांत होत असल्यामुळे नागरिकांचा,वकिलांचा वेळ आणि पैशांचा मोठा अपव्यय होत आहे. आता या कामकाजाचे पिंपरी नेहरूनगर न्यायालयात वर्ग झाल्यास नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.”
– महेश लांडगे, आमदार भोसरी विधानसभा,भाजपा, पिंपरी-चिंचवड, पुणे.
“पिंपरी-चिंचवड ॲडव्होकेट्स बार असोसिएशन व आमदार महेश लांडगे यांच्या यशस्वी पाठपुराव्याने जर पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व पोलिस ठाण्यांचे कामकाज नेहरूनगर न्यायालयात वर्ग झाले तर निश्चितच शहरातील नागरिकांना न्यायव्यवस्थेची प्रक्रिया आणखी सुलभ होईल.”
– ॲड. मंगेश खराबे, ॲडव्होकेट.








