प्रियंका इंगळेच्या नेतृत्वात भारताने जिंकला खो खो विश्वचषक


इंद्रायणी महाविद्यालयाची विद्यार्थिनी विश्वविजेत्या खो-खो टीमची कर्णधार प्रियंका इंगळेचे सर्वत्र कौतुक



तळेगाव दाभाडे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) –
इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. संस्थेची माजी विद्यार्थिनी व भारतीय खो – खो संघाची कर्णधार प्रियंका इंगळे हिच्या नेतृत्वात भारतीय खो खो संघाने विश्वचषकावर आपले नाव कोरले. या सामन्यात प्रियंकाच्या नेतृत्वात भारतीय महिला खो-खो संघाने नेपाळ संघाचा 38 गुणांच्या फरकाने पराभव केला. तिच्या नेतृत्वातील भारतीय खो खो संघाच्या यशाबद्दल इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेचे आधारस्तंभ मावळभूषण माजी आमदार कृष्णराव भेगडे, इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष रामदास आप्पा काकडे, कार्यवाह चंद्रकांत शेटे, संस्थेचे सर्व पदाधिकारी, प्राचार्य डॉ. संभाजी मलघे, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक यांनी कर्णधार प्रियांका इंगळे, तसेच महिला खो-खो टीमचे अभिनंदन करीत शुभेच्छा दिल्या.
प्रियंका इंगळे ही इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या इंद्रायणी महाविद्यालयाची माजी विद्यार्थिनी आहे. तिच्या नेतृत्वात भारताने खो-खो विश्वचषकावर आपले नाव कोरले. त्यामुळे इंद्रायणी महाविद्यालयात उत्साहाचे वातावरण तयार झाले आहे.
प्रियंका इंगळे हिचे मूळ गाव बीड जिल्ह्यातील असून, पुण्याच्या पिंपरी चिंचवडमध्ये ती लहानाची मोठी झाली. पिंपरी चिंचवडच्या वडमुखवाडीतील श्री सयाजीनाथ महाराज विद्यालयात प्रियंकाचे शिक्षण झाले व तेथेच तिला खो खो खेळात करिअर करण्याची संधी मिळाली. प्रियंका इंगळे ही वयाच्या बाराव्या वर्षापासून राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत आहे. सातवीत असताना प्रियंकाने तिच्या कारकिर्दीतील पहिली राष्ट्रीय स्पर्धा खेळली.
आपल्या पंधरा वर्षाच्या खो-खो कारकिर्दीत तिने आत्तापर्यंत 23 राष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे. 2023 मध्ये चौथ्या आशियाई खो – खो स्पर्धेत तिने सुवर्णपदक जिंकले होते. यापूर्वी तिला 2022 मध्ये राष्ट्रीय स्तरावर राणी लक्ष्मीबाई पुरस्कार मिळाला.

प्रियंकाच्या या कामगिरीच्या माध्यमातून इंद्रायणी महाविद्यालयाची पर्यायाने मावळ तालुक्याची मान उंचावली आहे. इंद्रायणी महाविद्यालय विद्यार्थ्यांसाठी क्रीडा प्रकारात नेहमीच पोषक वातावरण निर्माण करीत आले आहे. भविष्यात प्रियंकासारखे अनेक खेळाडू राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकतील.
– रामदास काकडे, अध्यक्ष, इंद्रायणी विद्यामंदिर संस्था, तळेगाव दाभाडे








