शत्रुघ्न काटे युथ फाउंडेशनच्या अनोख्या उपक्रमास पिंपळे सौदागर वासियांचा उत्स्फूर्त प्रतिसाद


पिंपळे सौदागरमधील तीन हजार नागरिकांनी हाताचे ठसे उमटवत साजरा केला स्वातंत्र्य दिन



पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – देशाचा ७८वा स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून नगरसेवक शत्रुघ्न काटे युथ फाऊंडेशन मार्फत पिंपळे सौदागर याठिकाणी एका आगळ्यावेगळ्या विक्रमाला गवसणी घालण्यासाठी केलेल्या प्रयत्नाला सौदागर वासियांनी उत्तम प्रतिसाद देत यशस्वी केले. यावेळी साधारण ३००० नागरिकांनी आपल्या हाताचे ठसे उमटवत तिरंगा बनविला.

शहरात शत्रुघ्न काटे आणि नवीन व भन्नाट उपक्रम असे एक समीकरण तयार झाले आहे आणि यामुळेच प्रभागात एक नवीन आगळावेगळा असा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यामध्ये १५ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता कै.बाळासाहेब कुंजीर क्रीडांगण,कुणाल आयकॉन रोड याठिकाणी जागतिक विक्रमाला गवसणी घालण्याचा प्रयत्न केला. यामध्ये आपण एक हस्तनिर्मित १५० फूट लांब आणि ४ फूट रुंद या मापाचा पांढऱ्या कापडावर तिरंगा बनवण्याच्या प्रयत्न केला म्हणजे यामध्ये परिसरातील शालेय विद्यार्थी, महिला,जेष्ठ नागरिक तसेच इतर लोकांनी आपल्या हाताच्या ठस्यांना हिरवा तसेच भगवा रंग लावून पांढऱ्या कापडावर छाप मारून तिरंगा बनविला. लहानग्या चुमुकले,तरुण वर्ग तसेच जेष्ठ नागरिकांनी उपस्थित राहून या उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. देशाचा अभिमान असलेला तिरंगा आपल्या स्पर्शाने साकारत असल्याची हि देशप्रेमी भावना मनाला भारावून टाकणारी होती.
तसेच या ठिकाणी उपस्थित आजच्या पिढीला या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी हौतात्म्य स्वीकारलेल्या स्वातंत्र्य सैनिका बद्दल माहिती देऊन स्वातंत्र्य दिनाचे महत्व पटवून देण्यात आले. तसेच देशभक्तीवर आधारित विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात आले होते .
यावेळी नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी सांगितले कि लवकरच आज केलेल्या या उपक्रमाचे व्हिडीओ लिम्का बुक ऑफ रेकॉर्डच्या अधिकृत यंत्रणेला सादर करणार आहोत आणि नक्कीच आपला नवीन किर्तीमान स्थापित होऊन पिंपळे सौदागरचे नाव जागतिक पातळीवर कोरले जाईल असा विश्वास व्यक्त केला तसेच आम्ही करत असलेल्या या प्रयत्नांना यशस्वी करण्यासाठी सर्वानी उपस्थित राहून सहकार्य केल्याबद्दल परिसरातील सर्व नागरिकांचे आभार व्यक्त केले.








