ताज्या घडामोडीपिंपरीभोसरी
सोसायटीधारकांच्या समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध! – भाजपा नेते तथा आमदार महेश लांडगे यांचा विश्वास


– सोसायटी फेडरेशनच्या ‘महासंमेलन’ला उत्स्फूर्त प्रतिसाद
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – माझ्या संघर्षाच्या काळात सोसायटीधारक नागरिकांनी मला साथ दिली. त्यांच्या समस्या आणि अडचणी सोडवण्यासाठी कायम प्राधान्य देण्यात येईल. रक्ताची नाती नसतानाही ही आपुलकीचे नाते तयार झाले. विधानसभा निवडणुकीत सोसायटीधारकांच्या मदतीमुळेच मी विजयाची ‘हॅट्रिक’ करु शकलो. याबाबत सोसायटीधारकांसोबत कृतज्ञता व्यक्त करतो, अशा भावना भाजपा नेते तथा आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केल्या.
चिखली-मोशी-चऱ्होली-पिंपरी-चिं चवड सोसायटी फेडरेशनच्या माध्यमातून शहरातील सोसायटीधारकांसाठी ‘‘महासंमेलन-2025’’ आयोजित करण्यात आले. यावेळी आमदार लांडगे बोलत होते. याप्रसंगी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पद्मश्री गिरीश प्रभुणे, सोसायटी फेडरेशनचे अध्यक्ष संजीवन सांगळे यांच्यासह फेडरेशनचे पदाधिकारी आणि हजारोंच्या संख्येत सोसायटीधारक उपस्थित होते. विशेष म्हणजे, ‘‘जय जय महाराष्ट्र माझा..’’ हे महाराष्ट्र गीत गाऊन आमदार महेश लांडगे यांनी उपस्थित सोसायटीधारकांची मने जिंकली.
पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी मनोगतात फेडरेशनच्या कामाचे आणि त्यांच्या एकजुटीचे कौतुक केले. प्रभुणे म्हणाले की, चिंचवडमध्ये क्रांतिवीर साफेकर स्मारक समितीच्या माध्यमातून शोषित वंचित घटकांसाठी काम केले जाते. या शहराने अशा घटकांसाठी मोठे काम केले आहे. चोऱ्यामाऱ्या करणारी मुले आज शिकतात, मोठी होतात तेव्हा या शहराचे दातृत्व दिसून येते.
सोसायटी फेडरेशनचे अध्यक्ष संजीवन सांगळे म्हणाले की, चिखली मोशी सोसायटी फेडरेशनच्या माध्यमातून या भागातील सोसायटी धारकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. उपयोग कर्ता शुल्क नागरिकांच्या माथी मारली जात असताना फेडरेशननी भूमिका घेतली. आमदार महेश लांडगे यांची साथ या भूमिकेला लाभली. यांच्या माध्यमातून हे शुल्क रद्द झाले. अशी अनेक नागरिकांच्या उपयोगाची कामे फेडरेशनच्या माध्यमातून केली जातात. त्यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून या भागातील आमदारांची खंबीर साथ लागते. म्हणूनच ही अराजकीय फेडरेशन असतानाही संपूर्ण फेडरेशन आमदार लांडगे यांच्या पाठीशी कायमच खंबीरपणे उभे आहे. आगामी काळातही पार्किंग रस्ते ,पाणी, विकसक आणि सोसायटी धारक यांचे प्रश्न सोडवण्यासाठी फेडरेशनच्या माध्यमातून काम केले जाणार आहे, असेही सांगळे यांनी भाषणात नमूद केले.
प्रतिक्रिया :
पिंपरी-चिंचवड शहरातील सोसायटीधारकांसाठी सहकुटुंब सहपरिवार आयोजित केलेल्या महास्नेहसंमेलन मेळाव्यास सोसायटीधारकांनी उदंड असा प्रतिसाद दिला आणि आपली एकतेची भावना जोपासत एकी दाखवून दिली. त्याबद्दल सोसायटीधारकांचे आभार व्यक्त करतो. सोसायटीधारकांसाठी येणाऱ्या अडचणी समस्या आणि भविष्यासाठी फेडरेशन हे कटिबद्ध असेल.
– दीपक निकम, प्रवक्ता, चिखली-मोशी- चऱ्होली -पिंपरी चिंचवड हाउसिंग सोसायटी फेडरेशन.
******
प्रतिक्रिया :
‘‘एक है तो सेफ है..’’ असा नारा जो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे. त्याचा खरा अर्थ सोसायटीधारकांनी जाणला आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत सोसायटीधारकांनी एकजुट केली आणि माझ्या पाठीशी ताकद उभा केली. आगामी काळात सोसायटीधारकांच्या न्याय हक्कांसाठी कायम आग्रही राहण्याचा संकल्प आम्ही केला आहे.
– महेश लांडगे, आमदार, भोसरी विधानसभा, भाजपा, पिंपरी-चिंचवड, पुणे.








