प्राधिकरण आणि बिजलीनगरमध्ये सुस्थितीतील पदपथ उखडून नव्याने ‘पेव्हर ब्लॉक’ बसवण्याची घाई


करदात्या नागरिकांच्या कररूपी पैशांवर प्रशासनाचा डल्ला..



शिवसेनेच्या संतोष सौंदणकरांची तीव्र नाराजी…

निगडी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – ‘अ’ क्षेत्रीय हद्दीतील प्राधिकरण आणि बिजलीनगर परिसरात मुख्य मार्गाच्या कडेला असणारा सुस्थितीतील पदपथ उखडून काढण्यात आलेला आहे. या ठिकाणी सुस्थितीतील दगडी काढून सिमेंटचे नव्याने ‘पेव्हर ब्लॉक’ पुन्हा बसवण्यात येणार आहेत. त्यामुळे करदात्या नागरिकांचा कररूपी पैसा वाया जात आहे. रस्त्याच्या डिव्हायडरवर अनेक भटकी कुत्री विष्ठा करून जातात. त्यांच्याकरिता या अनावश्यक कामास प्राधान्य दिले जात आहे का? असा सवाल शिवसेना चिंचवड विधानसभेचे ठाकरे पक्षाचे शहर संघटक संतोष सौंदणकर यांनी प्रशासनाच्या कारभाराविरोधात प्रसिद्धीपत्रकाद्वारे उपस्थित केला आहे.
पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, ‘प्रशासक राजवटीत विकासकामांच्या गोंडस नावाखाली भरमसाट कामे केली जात आहेत. याबाबत अनेक जागरूक नागरिक नापसंती व्यक्त करीत असताना देखील राजरोसपणे ही कामे सुरू आहेत. प्रभागातील चांगली कामे उखडून तीच कामे पुन्हा करण्याचा सपाटा लावला जात आहे.
दरम्यान पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ‘अ’ क्षेत्रीय कार्यालयालगत बिजलीनगर उड्डाणपूलापासून ते भक्ती शक्तीकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर काही वर्षांपूर्वीच पदपथ तयार करण्यात आला होता. हा पदपथ सुस्थितीत होता. आता तो उखडून तिथेच काहीसे रुंदीकरण करून नव्याने पदपथ उभारण्यात येत आहेत. मुळात इथे कुठलीही दुरुस्ती करण्याची आवश्यकता नसताना प्रशासनाने हा घाट घातला आहे. तर, बिजलीनगर, हनुमान मंदिर परिसरात मुख्य रस्त्याशेजारील चांगले ब्लॉक उखडून पुन्हा लेवल करून लावण्यात येणार आहेत. त्यामुळे नाहक पैसा खर्च होत आहे. या खर्चामध्ये नदी सुधार प्रकल्पांतगर्त वर्षाला एक याप्रमाणे मैलाशुद्धीकरण केंद्र उभारले जाऊ शकते. मात्र, नको तिथे उधळपट्टी कशासाठी?, असा सवाल शहरातील नागरिकांना पडलेला आहे. प्रशासनाने याचा खुलासा करावा, अशी शहरातील करदात्यांची मागणी आहे, असे या पत्रकात संतोष सौंदणकर यांनी म्हटले आहे.








