चिंचवडताज्या घडामोडीपिंपरीसांस्कृतिक
गझल मैफलीत श्रोते मंत्रमुग्ध
पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – कशिश प्रस्तुत रू – ब – रू या हिंदी – मराठी गझलांच्या सुरेल मैफलीने रविवार, दिनांक ०१ सप्टेंबर २०२४ रोजी निगडी प्राधिकरणातील पेठ क्रमांक २७अ, संत तुकाराम उद्यानाच्या मागे असलेल्या आय. आय. सी. एम. आर. ऑडिटोरियममधील गझलप्रेमी रसिकांना मंत्रमुग्ध केले. संपदा रानडे आणि कुमार करंदीकर यांच्या एकल आणि युगुलस्वरातील गझलांचा संचालिका डॉ. अश्विनी कुलकर्णी यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर रसिकांनी आस्वाद घेतला.
गझल ही लिखित विधा गायनाच्या माध्यमातून जेव्हा रसिकांच्या काळजापर्यंत पोहोचून उत्स्फूर्त दाद मिळवते तेव्हाच ती पूर्णत्वाला जाते, असे म्हटले जाते. याचा पुरेपूर प्रत्यय रू – ब – रू मैफलीत आला. गालिब, नासीर काझमी, निदा फाजली, सुरेश भट, इलाही जमादार, दीपक करंदीकर यांच्यापासून ते ताज्या दमाच्या सागर पाटील यांच्यापर्यंतच्या प्रचलित आणि अप्रचलित उर्दू, हिंदी, मराठी गझलांची निवड ही मुळातच वैविध्यपूर्ण भावनांचा परिपोष करणारी होती. हृदयनाथ मंगेशकर, राम कदम आणि अन्य दिग्गज संगीतकारांच्या रचनांसोबत स्वतः कुमार करंदीकर यांनीही स्वरसाज दिलेल्या रचनांना श्रोत्यांनी आपलेसे केले. ताना, मुरक्या, पलटे अथवा गायकीतील चमत्कृतींच्या आहारी न जाता स्वच्छ अन् स्पष्ट शब्दोच्चार आणि तरीही सुरेलता सांभाळून संपदा रानडे आणि कुमार करंदीकर यांनी सर्व गझलरचना आत्मविश्वासाने सादर करून श्रोत्यांची मने जिंकली. अजित देशपांडे यांची तबला आणि करंदीकरांची संवादिनी साथ दुधात मिसळून गेलेल्या साखरेइतकीच मधुर होती.
मूळ पर्शियन भाषेतील शब्दांसह गझलेने उर्दू, हिंदी आणि अन्य भाषेतील अर्थवाही अन् सुंदर शब्द स्वीकारले आहेत. सादरीकरण करताना अशा अनवट शब्दांचा अर्थ उलगडून शेराचा आशय त्यातील भावसौंदर्यासह श्रोत्यांपर्यंत पोहोचविण्याची काळजी गायकांनी घेतली. त्यामुळे अनोळखी गझल असली तरी त्यातील शेर रसिकांच्या मर्मबंधातील हळव्या भावनांना स्पर्शून मनात रुजत राहिले; आणि प्रत्येक रचनेनंतर टाळ्यांची उत्स्फूर्त दाद मिळत राहिली. स्मिता मोरवाले यांनी समयोचित निवेदन करीत मैफलीची रंगत शेवटपर्यंत कायम राखली. गझल या विधेचा प्रचार अन् प्रसार करण्यासाठी वेळोवेळी पदरमोड करून कशिश या संस्थेने केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांना रसिकांसह अनेक मान्यवरांनी हातभार लावले.