विद्यार्थ्यांनी आत्मीक सामर्थ्य ओळखावे – प्रा.मिलिंद जोशी


एमआयटी एडीटीत राष्ट्रीय युवा दिनानिमित्त विविध कार्यक्रम



पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – ध्येयनिश्चिती करा व ती साध्य होईपर्यंत स्वस्त बसू नका हा, स्वामी विविकानंदांचा विचार आज देशाच्या युवकांसाठी अत्यंत महत्वाचा आहे. देशाच्या विकासाची मुख्य जबाबदारी युवकांच्या खांद्यावर आहे. ते बुद्धिमान, तंत्रज्ञानाने निपुण आणि सर्जनशील आहेतच. त्यांच्यात नाविण्याचा शोध घेण्याची वृत्ती देखील आहे. परंतु, आपलं आत्मीक सामर्थ्य ओळखण्यात ते कमी पडतात. त्यामुळे, त्यांनी विवेकानंदांचा आदर्श घेवून सामर्थ्य ओळखावे, असे आवाहन महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह विचार भारतीचे संपादक प्रा.मिलिंद जोशी यांनी केले.

ते येथील एमआयटी आर्ट, डिजाईन व टेक्नाॅलाॅजी विद्यापीठातील कुमार व्यास सभागृहात स्वामी विवेकानंद चेअर तर्फे राष्ट्रीय युवा दिनाच्या औचित्याने आयोजित कार्यक्रमात बोलत होते. याप्रसंगी, विद्यापीठाचे कुलगुरू डाॅ.राजेश एस., आचार्य श्री शिवम, डाॅ.माधवी गोडबोले, परीक्षा नियंत्रक डाॅ.ज्ञानदेव नीलवर्ण, डाॅ.अतुल पाटील, सहाय्यक कुलसचिव डाॅ. विशांत चेमटे आदी मान्यवर उपस्थित होते.
डाॅ.जोशी पुढे बोलताना म्हणाले, भारत हा पहिल्यापासून तंत्रज्ञान, विज्ञानाने समृद्ध आहे. पश्चिमेतील राष्ट्रांनी वैज्ञानिक प्रगती केली मात्र, त्यांचा आत्मीक, मानसिक व भावनिक विकास झाला नाही. त्यामुळेच, “पूर्वेने पश्चिमेला तत्वज्ञान द्यावे व पश्चिमने पूर्वेकडून विज्ञान घ्यावे, व दोघांनी विश्वकल्याणाचे पसायदान गावे”, असे सकारात्मक जागतिकीकरणाचे प्रथम उद्गाते स्वामी विवेकानंद म्हणत असत. अगदी अशाच प्रकारे विद्यार्थ्यांना आत्मीक सामर्थ्यवान बनविण्याचे कार्य डाॅ.विश्वनाथ कराड व डाॅ.मंगेश कराड करत आहेत, असेही ते म्हणाले.
विश्वशांती प्रार्थनेने सुरू झालेल्या या कार्यक्रमाची सांगता, पसायदानाने करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डाॅ.नीलवर्ण यांनी तर आभार प्रा.अमिषा जयकर यांनी तर सुत्रसंचलन डाॅ.अशोक घुगे यांनी केले.
चौकट
युवा दिनानिमित्त भरगच्च कार्यक्रम
राष्ट्रीय युवा दिनाच्या निमित्ताने विद्यार्थी कल्याण विभागाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात वर्षभर उल्लेखनिय कामगिरी करणारे विद्यार्थी, विद्यापीठाचा अभिमान असणारे खेळाडू, युवा शिक्षक आदींचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाची सुरुवात नशा मुक्ती संकल्प करून सायकल रॅलीने करण्यात आली. त्यानंतर, विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांवर आपले नृत्याविष्कार सादर केले. विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डाॅ.सुराज भोयार, डॉ. उल्हास माळवदे, डॉ. हनुमंत पवार यांच्या पुढाकारातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.








