ताज्या घडामोडीपिंपरीभोसरी

गीता भक्ती अमृत महोत्सवात महिला सक्षमीकरणाला मिळाला नवीन दृष्टीकोन

Spread the love

 

आळंदी ( महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – मातृशक्ती परिषद – गीता भक्ती अमृत महोत्सवात महिला सक्षमीकरणाला मिळाला नवीन दृष्टीकोन या कार्यक्रमाला पूज्य श्री श्री रविशंकरजी महाराज, प्रसिद्ध कार्यकर्त्या श्रीमती राजश्रीजी बिर्ला आणि इतर मान्यवर संत महात्मे उपस्थित होते. तसेच महाराष्ट्र सरकारचे वन, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर सच्चिदानंद मुनगंटीवार अतिथी उपस्थित होते.

समाजातील महिलांचे महत्त्व पटवून देणे आणि त्यांना योग्य तो सन्मान देत प्रोत्साहित करणे यासाठी गीता परिवाराने गीता भक्ती अमृत महोत्सवात आयोजित केलेल्या मातृशक्ती परिषदेने सर्वांमध्ये उत्साहाची लाट पसरली. उत्सवाच्या चौथ्या दिवशी, ७ फेब्रुवारीला झालेल्या या परिषदेत, महिला सक्षमीकरणावर विशेष चर्चा झाली.
पवित्र तीर्थ आळंदीमध्ये गीताभक्ती अमृत महोत्सवाच्या निमित्ताने भाविकांना प्रथमच ८१ हवन कुडीय महायज्ञ अनुभवायला मिळत आहे. दररोज निरनिराळे यजमान समाजकल्याणासाठी या महायज्ञाचे यजमानपद भूषवित आहेत. २००० हूनही अधिक वैदिकांकडून सतत होणार्‍या पवित्र मंत्र जपातून निर्माण होणारी कंपने हा न भूतो न भविष्यती असा अनुभव आहे.
गीताभक्ती अमृत महोत्सवात उपस्थितांच्या, श्री राम जय राम जय जय राम या जयघोषाने श्रीमद्भागवत कथेच्या तिसऱ्या दिवसाची सुरुवात झाली. भाविकांनी एवढ्या उत्स्फूर्तपणे केलेल्या जयघोषाने प्रत्येक भक्ताची इच्छा परमात्म्यापर्यंत पोहचत असल्याची अनुभूती आली.

समाजोन्नती आणि सशक्तीकरणासाठी आपले जीवन समर्पित करणाऱ्या विविध क्षेत्रांतील बारा आदरणीय महिलांचा सत्कार करताना सर्वांनाच स्वामीजींचा वात्सल्यभाव दिसून आला. त्यांत श्रीमती लताताई भिशीकर, भाग्यलता पाटसकर, प्रमिला माहेश्वरी, इंदुमती काटदरे, लीना मेहेंदळे, विजया गोडबोले, ललिता मालपाणी, लीना रस्तोगी, कल्याणी नामजोशी, सरोजा भाटे, डॉ. मंगला चिंचोरे आणि मंदा गंधे यांचा समावेश होता. स्वामीजी आणि इतर विशेष पाहुण्यांनी या महिलांचे त्यांच्या निस्वार्थ योगदाना बद्दल कौतुक केले.

परमपूज्य श्री गोविन्ददेव गिरजी महाराज म्हणाले, “आज १२ उल्लेखनीय महिलांचा सन्मान करताना, त्यांच्या अमूल्य प्रयत्नांची आणि परिश्रमाची आपण दखल घेऊया. त्यांचे निःस्वार्थ योगदान हे समाजाच्या कल्याणासाठी आणि आपल्या परंपरेचे रक्षण करण्यासाठी त्यांच्या वचनबद्धतेचा पुरावा आहे.”
स्वामी श्री गोविंद देव गिरीजी महाराज, पूज्य श्री श्री रविशंकर जी महाराज, आदरणीय श्री सुधांशुजी महाराज, आदरणीय श्रीमती राजश्रीजी बिर्ला, आदरणीय साध्वी ऋतंभराजी दीदी मा, आदरणीय श्री चिन्ना जियार स्वामीजी महाराज आणि आदरणीय बाबा श्री सत्यनारायणजी मौर्य यांसारख्या पूज्य अध्यात्मिक गुरुंची आणि विचारवंतांचीही उपस्थिती पाहायला मिळाली.

गीता भक्ती अमृत महोत्सवावर आपले विचार आणि भावना व्यक्त करताना, पूज्य श्री श्री रविशंकरजी महाराज म्हणाले, “तुम्ही संपूर्ण भारतातील संत समाजाला ज्ञानाच्या धाग्यात बांधले आहे आणि हे संत परमात्मा भगवान श्रीकृष्णच आहेत. त्याबद्दल मी स्वामीजींचे आभार मानतो. तुमचा गीता भक्ती अमृत महोत्सव हा योगायोग नसून एक दैवी योजना आहे. आळंदीच्या पावन भूमीवरील या उत्सवातील भक्तीच्या लाटा इतक्या प्रगल्भ आहेत की नास्तिकही त्यांच्या प्रभावापासून लांब राहू शकणार नाहीत.”
भारत माँ की आरती साठी प्रसिद्ध असलेल्या बाबा श्री सत्यनारायणजी मौर्य यांच्या आत्मस्फूर्ती देणाऱ्या ‘भारतमाता आरती’ने या दिवसाचा उच्चांक गाठला. आपल्या अनोख्या पद्धतीने, बाबाजींनी अतिशय सुंदरपणे भारताच्या समृद्ध इतिहासाचे दर्शन घडवले, भारतीय असण्याचे खरे मर्म उलगडले. आपल्या विलक्षण कला आणि संगीत सादरीकरणाने, बाबाजींनी सकारात्मक प्रभाव पाडला, ज्ञान वृद्धिंगत केले आणि सर्व उपस्थितांमध्ये अभिमानाची चेतना जागवली.

गीता भक्ती अमृत महोत्सवा विषयी
वेद व्यास प्रतिष्ठान आणि गीता परिवार यांनी आयोजित केलेला गीता भक्ती अमृत महोत्सव हा अध्यात्म, भक्ती, समृद्ध भारतीय संस्कृती आणि देशभक्ती यांचा अद्वितीय संगम आहे. या कार्यक्रमात २००० हून अधिक वैदिक आचार्यांकडून एक दिव्य, अभूतपूर्व भव्य ८१ कुंडीय महायज्ञ केला जात आहे. त्याचबरोबर भागवत कथा, हरिकीर्तन, दैवी पवित्र ग्रंथांचे अखंड पठण ऐकायला मिळेल. ४५० हून अधिक कलाकार रामायण आणि भारतीय संत परंपरांवरील महानाट्य सादर करतील. आपला दैवी वैदिक वारसा, समृद्ध भारतीय संस्कृती आणि भक्ती साजरी करण्याचा या महोत्सवाचा उद्देश आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button