हिंजवडीसाठी पर्यायी रस्त्याच्या कामाला मिळणार गती – उदय सामंत


पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – उद्योगांच्या समस्या सोडविण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने सर्व संबंधित विभागांशी समन्वय साधून उपाययोजना कराव्यात, असे निर्देश उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिले. रस्ते, वाहतूक कोंडी, पार्किंगचा प्रश्न सोडविण्यासह आवश्यक तेथे उद्योगांना जागा, पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, अशी ग्वाहीदेखील त्यांनी दिली.



पिंपरी-चिंचवड येथे उद्योग विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य अभियंता नितीन वानखडे, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे मुख्य अभियंता अशोक भालकर, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्पसंचालक संजय कदम, पुणे विभागाचे उद्योग सहसंचालक शैलेंद्र राजपूत, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या प्रादेशिक अधिकारी अर्चना पाठारे, अधीक्षक अभियंता निलेश मोढवे आदींसह उद्योग संघटना, उद्योगांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

उदय सामंत म्हणाले, पीएमआरडीएच्या माण-म्हाळुंगे टी. पी. स्कीमला लवकरच मुख्यमंत्र्यांची मान्यता मिळणार असल्याने हिंजवडीसाठी पर्यायी रस्त्याच्या कामाला गती मिळणार आहे. राजीव गांधी माहिती तंत्रज्ञान उद्यानातील रस्त्यातील खड्डे दुभाजक, आदींची देखभाल दुरुस्ती तातडीने करण्याच्या दृष्टीने प्रस्तावाचा पाठपुरावा करावा.
सामंत म्हणाले, तळेगाव येथील फ्लोरीकल्चर पार्कमधील उद्योगांना वाटप केलेल्या भूखंडांबाबत वस्तुस्थिती तपासून घ्यावी. तसेच वाटप केलेले विनावापर भूखंड अन्य उद्योगांना देण्याबाबत विचार करण्यात येईल. तळवडे माहिती तंत्रज्ञान पार्क येथील उद्योगांच्या समस्या सोडविण्यासाठी संरक्षण विभागाशी संपर्क साधा. राजीव गांधी माहिती तंत्रज्ञान उद्यानातील टप्पा क्र. ३ येथील पोलिस चौकीसाठी आवश्यक त्या जागेचा ताबा पोलिस विभागास देण्यात आला आहे, यावेळी सीसीटीव्ही प्रकल्प, घनकचरा व्यवस्थापन, पावसाळी पाण्याची वाहिनी याविषयी चर्चा झाली.
पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेकडून सत्कार…
दरम्यान मंत्री उदय सामंत यांची महाराष्ट्र राज्याच्या उद्योग मंत्रीपदी फेरनिवड झाल्याबद्दल त्यांचा पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेच्या वतीने अध्यक्ष संदीप बेलसरे आणि पदाधिकाऱ्यांनी सत्कार केला. यावेळी पिंपरी, चिंचवड, भोसरी येथील सीईटीपी प्लांट, घातक कचरा प्रक्रिया प्रकल्प, अग्निशमन केंद्र व चाकण येथील उद्योजकांना मुळ शेतकऱ्यांकडून जमीनीवर बांधकाम करण्यास विरोध होत असल्याबाबत बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.








