ताज्या घडामोडीपिंपरी

मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी महापालिका शहरात राबविणार विविध उपक्रम

Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – सार्वत्रिक लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये नागरिकांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी अधिकारी, कर्मचारी आणि कामगारांना भरपगारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. याबाबत राज्य शासनाकडून परिपत्रकही जारी करण्यात आले आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड शहरातील औद्योगिक संस्था, हॉटेल व्यावसायिक, मॉल असोसिएशन, लघुउद्योग संघटना यांनी आपल्या कामगारांना मतदान करण्यासाठी भरपगारी सुट्टी द्यावी. तसेच सर्वांनी लोकशाहीच्या उत्सवात सहभागी व्हावे आणि शहरातील मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्त शेखर सिंह यांनी केले.

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील मतदारांनी मोठया प्रमाणात मतदान करावे याकरिता नाविन्यपूर्ण उपक्रम महानगरपालिकेच्या वतीने राबविण्यात येत आहेत. त्यामध्ये शहरातील उद्योजक, लघुउद्योजक संघटना, ज्येष्ठ नागरिक संघ, दिव्यांग संघटना व संस्था, मॉल आणि थिएटर असोसिएशन, शहरातील गृहनिर्माण संस्थांचे फेडरेशन तसेच विविध सेवाभावी संस्था यांच्या प्रतिनिधींसमवेत मतदार जागरूकता आणि सहभाग कार्यक्रमातंर्गत बैठकीचे आयोजन पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमधील दिवंगत महापौर मधुकर पवळे सभागृह येथे करण्यात आले होते, यावेळी आयुक्त सिंह बोलत होते.

या बैठकीस अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, उल्हास जगताप, निवडणूक उपजिल्हाधिकारी तथा सहाय्यक आयुक्त अविनाश शिंदे, मतदार जागरूकता आणि सहभाग कार्यक्रमाचे नोडल अधिकारी तथा उप आयुक्त अण्णा बोदडे, राजेश आगळे, क्षेत्रीय अधिकारी सुचिता पानसरे, अमित पंडित, सीताराम बहुरे, अजिंक्य येळे, उमेश ढाकणे, सहाय्यक आयुक्त विजयकुमार थोरात, यशवंत डांगे, श्रीनिवास दांगट, तानाजी नरळे, मुकेश कोळप, स्मार्ट सिटीचे संयुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी किरण यादव तसेच पिंपरी चिंचवड लघुउद्योजक संघटनेचे संदीप बेलसरे, पिंपरी चिंचवड औद्योगिक फेडरेशनचे गोविंद पानसरे, वसंत परिळे, जगदीश जोशी, मधुकर गायकवाड, शहरातील विविध सामाजिक, पिंपरी चिंचवड हौसिंग सोसायटी फेडरेशनचे संजय गोरड, संजीवन सांगडे, पुणे जिल्हा हौसिंग सोसायटी फेडरेशनचे आशिष सातकर, राहुल मोकाशी, घरकुल अपंग सहायता संस्थेचे संगीता जोशी, दत्तात्रय भोसले, पिंपरी चिंचवड लघुउद्योजक संघटनेचे संदिप बेलसरे, जयंत कड, सीआयआयचे प्रसाद बच्चन, ओमकार भोसेकर, रोहित रासकर, पिंपरी चिंचवड लघुउद्योजक संघटनेचे प्रमोद रारे, एलप्रो सिटी स्क्वेअरचे  निशांत कान्सल, चिंतन केत, फिनिक्स मॉलचे अमित अंबुरे तसेच विविध औद्योगिक, लघुउद्योग, गृहसंस्था, दिव्यांग संघटनांचे प्रतिनिधी आणि महापालिका कर्मचारी उपस्थित होते.

आयुक्त शेखर सिंह म्हणाले, शहरातील सर्व औद्योगिक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना सुट्टी देणे आवश्यक आहे. प्रत्येक कर्मचाऱ्याला सुट्टी देणे शक्य नसल्यास किमान २ तासांची सवलत देणे गरजेचे आहे. तसेच शहरातील विविध संस्थांनी तसेच मोठ्या कंपन्यांनी आपापल्या स्तरावर मतदानाबाबत जनजागृती करावी. सर्व समाज घटकांना मतदान जनजागृती उपक्रमात सहभागी करून घेण्यावर भर द्यावा. यासाठी संस्थांना आणि कंपन्यांना महापालिकेचे संपुर्ण सहकार्य राहील. महानगरपालिकेच्या माध्यमातून सर्व घंटा गाड्यांवर मतदार जनजागृतीबाबतच्या जिंगल्स प्रसारित करून जागरूती करण्यात येणार आहे. शहरातील सर्व महाविद्यालय सर्व मॉल्स याठिकाणीही विविध उपक्रम राबवून मतदान करण्याबाबतचे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात येणार आहे.

गृहनिर्माण संस्थांचे प्रतिनिधी, चेअरमन, सेक्रेटरी यांनीही सोसायटीमधील सर्व नागरिकांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करावे आणि विविध उपक्रम राबवावेत. शहरात अनेक मोठे मॉल आहेत. या मॉलच्या चालकांनी किंवा असोसिएशनच्या सदस्यांनी महापालिकेच्या स्मार्ट सारथी टीमच्या मदतीने मॉलमध्ये मतदान जगजागृती करण्यासाठी विविध समाजमाध्यमांचा वापर करावा. तसेच पथनाट्य, भित्तीपत्रके, सेल्फी पॉईंट्स इ. द्वारे जनजागृती करावी. मतदानाचा हक्क बजावून आलेल्या नागरिकांना प्रोत्साहन देण्यासाठी मॉल्स, थिएटर, हॉटेल्समध्ये सवलत देण्याबाबत संबंधितांनी विविध उपक्रम राबवावेत, असे आवाहनही आयुक्त सिंह यांनी केले.

 याव्यतिरिक्त मतदान जनजागृती उपक्रमात शहरातील विविध महिला बचत गटांनाही सामिल करून शहरात विविध उपक्रम राबविण्यात यावेत. तसेच आकाशचिन्ह विभागाच्या वतीने शहरात ठिकठिकाणी मतदान करण्याबाबत फलक लावण्यात यावेत. दिव्यांग बांधवांसाठी मतदान केंद्रांमध्ये व्हीलचेअर्सची व्यवस्था करण्यात यावी इ. सूचना यावेळी आयुक्त सिंह यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

तसेच शहरातील महानगरपालिकेच्या तसेच खासगी शाळांतील विद्यार्थ्यांमार्फत  पालकांची मतदान करण्याबाबतची संकल्प पत्र भरून घेण्याबाबत शिक्षण विभागामार्फत कार्यवाही करावी तसेच महाविद्यालयीन युवकांनी या मतदान प्रक्रियेमध्ये सहभागी होऊन मतदान करावे, याबाबतही आयुक्त सिंह यांनी आवाहन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button