भारताच्या सांस्कृतिक वारशाशी विद्यार्थी जोडले जावेत – हर्षवर्धन पाटील
अद्वितीय उत्साहात पिंपरी चिंचवड विद्यापीठाचा ‘अनंतम २०२५’ सांस्कृतिक सोहळा


पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भारताला शिक्षण, कला, क्रीडा, संस्कृतीचा मोठा वारसा आहे. या समृद्ध सांस्कृतिक वारशाशी विद्यार्थी जोडले जावेत यासाठी अनंतम सारखे सांस्कृतिक सोहळे झाले पाहिजेत असे प्रतिपादन पिंपरी चिंचवड विद्यापीठाचे कुलपती हर्षवर्धन पाटील यांनी केले.



पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या साते वडगाव मावळ येथील पिंपरी चिंचवड विद्यापीठ (पीसीयू) येथे ‘अनंतम २०२५’ हा वार्षिक सांस्कृतिक सोहळा प्रमुख सेलिब्रिटींच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

दोन दिवस चाललेल्या या वार्षिक सोहळ्यामध्ये कला, संस्कृती आणि राष्ट्रीय ऐक्याचा भव्य उत्सव अनुभवायला मिळाला. या सोहळ्याच्या आयोजनात ७५० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. तर ३,००० पेक्षा जास्त प्रेक्षकांनी उपस्थिती राहून सहभागी कलाकारांचा उत्साह वाढविला. पहिल्या दिवशी ‘सैराट’ चित्रपटातील मुख्य कलाकार आकाश ठोसर याने विद्यार्थ्यांसोबत संवाद साधत कार्यक्रमाची रंगत वाढवली. सांस्कृतिक कार्यक्रम हे विद्यार्थी व्यक्तिमत्त्वविकास, आत्मविश्वास आणि सामाजिक कौशल्ये जोपासण्याचे महत्त्वाचे माध्यम असल्याचे आकाश ठोसर याने सांगितले. दुसऱ्या दिवशीची रंगत ‘नटरंग’ मधील अभिनय व ‘अप्सरा आली’ या गाण्यासाठी प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या उपस्थितीमुळे विद्यार्थ्यांचा उत्साह शिगेला पोहोचला. सोनालीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्य आणि पराक्रमाला वंदन करणारे ‘शिव गर्जना’ सादर करून उपस्थितांना भारावून टाकले. विद्यार्थ्यांसोबत नाच, गाणी आणि मुक्त संवाद साधत या दोन्ही कलाकारांनी उत्सवाला खराखुरा सोहळ्याचा बाज दिला.
पीसीयूने अवघ्या दोन वर्षांत ३,००० हून अधिक विद्यार्थ्यांचे शिक्षण देऊन शिक्षण क्षेत्रात आंतरराष्ट्रीय पातळीवर भरारी घेतली आहे. विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक प्रगतीबरोबरच समाज आणि राष्ट्राच्या विकासातही मोठे योगदान आहे असे पीसीयूच्या कुलगुरू डॉ. मणिमाला पुरी यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांनी विविध राज्यांतील लोकनृत्ये व संगीताचे सादरीकरण करून भारताच्या संस्कृतीची विविधता सादर केली हे आपल्या देशाच्या बहुरंगी संस्कृतीचे प्रतिबिंब आहे. दोन वर्षात पीसीयूला मिळालेली अनेक मानांकने व पुरस्कार अभिमानास्पद आहे असे प्र-कुलगुरू डॉ. सुदीप थेपडे यांनी सांगितले.
अशा जल्लोषपूर्ण वातावरणातून एकोप्याची भावना वृद्धिंगत होते, ज्यामुळे सर्वांनाच दीर्घकालीन यशासाठी प्रेरणा मिळते असे अभिनेत्री सोनारी कुलकर्णी हिने सांगितले.
पिंपरी चिंचवड विद्यापीठ कुलपती हर्षवर्धन पाटील, पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीईटी) अध्यक्ष
ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्मा भोसले, सचिव विठ्ठल काळभोर खजिनदार शांताराम गराडे, व्यवस्थापन प्रतिनिधी अजिंक्य काळभोर, नरेंद्र लांडगे यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.








