अरविंद एज्युकेशन सोसायटी प्रशालेत पोवाडा, गोंधळ, लाठीकाठी व तलवारबाजी करीत शिवजयंती उत्साहात साजरी


पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – जुनी सांगवीतील अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या लिटल फ्लॉवर इंग्लिश मीडियम स्कुल, भारतीय विद्यानिकेतन विद्यालय, लिटल फ्लॉवर प्री प्रायमरी स्कुल आणि ज्युनिअर कॉलेजमध्ये ढोल – ताशाच्या गजरात विविध उपक्रमांनी शिवजयंती साजरी करण्यात आली.



संस्थेच्या अध्यक्षा आरती राव व सचिव प्रणव राव यांच्या हस्ते शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. प्रशालेत वर्षभर घेतलेल्या विविध स्पर्धांमधील विजेत्यांना आरती राव व प्रणव राव यांच्या हस्ते प्रमाणपत्र व बक्षीस देऊन गौरविण्यात आले. यावेळी भारतीय विद्यानिकेतनच्या मुख्याध्यापिका आशा घोरपडे, लिटल फ्लॉवर प्री प्रायमरी स्कुलच्या मुख्याध्यापिका पिंकी मनिकम, लिटल फ्लॉवर इंग्लिश मीडियम स्कुलच्या मुख्याध्यापिका नीलम पवार, ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्य शीतल मोरे, पर्यवेक्षिका स्मिता बर्गे, पर्यवेक्षिका प्रिती पाटील, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांनी शिवगर्जना करीत शिवरायांचे गीत व शिवरायांची प्रतिज्ञा सादर केली. आम्ही गड्या डोंगरचं राहणारं, चाकर शिवबाचं होणार,’ यावर नृत्य सादर केले. शिवगाथा ही ऐतिहासिक नाटिका, तसेच प्रतापगडावरील पराक्रम यामध्ये ‘अफजलखानाचा वध’ हे नाटक सादर केले. तसेच शिवरायांची आरती सादर केली. चित्रकला स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापासून, स्वराज्य स्थापनेची शपथ, कोंढाण्याचा विजय, पावनखिंडीतील लढाई, अफजल खानाचा वध, राज्याभिषेक असे विविध क्षण उभे करत पोवाडा, गोंधळ, लाठीकाठी व तलवारबाजी करीत वातावरण शिवमय होवून गेले. ‘जय भवानी, जय शिवाजी’ या घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले होते.
आरती राव यांनी विद्यार्थ्यांना शिवरायांच्या गनिमीकावा’ या युद्धतंत्राविषयी माहिती देत आपणही शिवाजी महाराजांसारखी निष्ठा ठेवूनच आपले कार्य प्रामाणिकपणे साधले पाहिजे, असे आवाहन केले. प्रणव राव यांनी हिंदवी स्वराज्य निर्मिती करताना शिवरायांनी मावळ्यांना केलेले उपदेश याविषयी माहिती दिली. तसेच सद्यस्थितीत छत्रपती शिवाजीमहाराजांसारखा राज्यकर्ता घडणे समाजासाठी अतिशय गरजेचे आहे, असे सांगितले.
मुख्याध्यापिका, शिक्षिका यांनी विद्यार्थ्यांना शिवरायांच्या विविध गुणांविषयी माहिती सांगून त्यातील एक तरी गुण आपण आत्मसात केला पाहिजे, असे आवाहन केले.
सूत्रसंचालन शिक्षिका दर्शना बारी यांनी, तर आभार शिक्षिका उषा साळवे यांनी आभार मानले.
कार्यक्रमाचे नियोजन शिक्षिका दर्शना बारी, उषा साळवे, स्मिता बर्गे, नीलम मेमाणे, प्रियांका कोकरे, ज्योती मोरे ,प्रीती पितळे, कीर्ती शिंपी यांनी केले.








