नाचून नव्हे शिवचरित्र वाचून शिवजयंती साजरी करू अभिनेत्री आर्या घारे हिचा अभिनव उपक्रम


पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) -छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत. मराठी मनामनात शिवराय वसले आहेत. मात्र काही हितशत्रू शिवरायांच्या चरित्राशी हेळसांड करण्याचा प्रयत्न करून समाज मने कलुषित करण्याचा प्रयत्न करत असतात. याचे मुख्य कारण म्हणजे आजच्या तरुणांचे श्रद्धास्थान शिवाजी महाराज असले तरी त्यांचे चरित्र अवगत नाही त्यामुळे काही समाजद्रोही सामाजिक द्वेष निर्माण करू पाहतात. याचसाठी चित्रपट अभिनेत्री आर्या घारे हिने आगळ्यावेगळ्या उपक्रमाद्वारे आज शिवजयंती साजरी केली. नाचून नव्हे शिवचरित्र वाचून शिवजयंती साजरे करूया असा संकल्प करून तिने आपल्या मैत्रिणींसह पिंपरी मोरवाडी चौक येथे शिवचरित्राचे वाटप करून ही शिवजयंती साजरी केली.



मोरवाडी चौकात जवळपास 3000 पुस्तकांचे तिने वाहन चालकांना व नागरिकांना वाटप केले यात चौकात बंदोबस्ताला असलेल्या वाहतूक पोलिसांना देखील हे चरित्र देऊन तिने सर्वांना शिवजयंतीच्या शुभेच्छा व्यक्त केल्या.
नववारी साडी मध्ये आपल्या पारंपारिक पोशाखात कपाळावर चंद्रकोर काढून तिने केलेल्या या उपक्रमाचे हजारो लोकांनी कौतुक केले.

आर्या घारे ही अभिनेत्री म्हणून पिंपरी चिंचवड करांना परिचित आहे देऊळ बंद, पोस्टर गर्ल, बंदीशाळा, अ ब क, परफ्यूम, भिरकिट आदी चित्रपटातून तिने अभिनय सादर केला आहे त्याचबरोबर बाळूमामाच्या नावानं चांगभलं या टीव्ही सिरीयल मध्ये देखील तिने काम केले आहे.
आर्या अभिनेत्री म्हणून जेवढी लोकप्रिय आहे. तेवढीच ती सातत्याने वेगवेगळ्या प्रकारचे सामाजिक उपक्रम राबवून देखील लोक मनावर अधिराज्य गाजवत आहे. तुम्ही मला बिया द्या मी तुम्हाला झाडे देते या उपक्रमांतर्गत तिने जवळपास 50 हजार झाडांचे संगोपन केले. तसेच सीताफळ, आंबा, पेरू, यासारखी झाडे लोकांना वाटली देखील आळंदी घाटात तिने मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण केले आहे त्याचबरोबर सुप्याजवळील जातेगाव येथे तिने नर्सरी उभी केली आहे.
आर्या आपला वाढदिवस देखील अनोख्या पद्धतीने साजरा करते. यावर्षीचा वाढदिवस तिने अनाथ आश्रमातील मुलींना सॅनिटरी पॅड वाटप करून साजरा केला. तर एक वर्ष लोकांच्या मनातील अंधश्रद्धा दूर करण्यासाठी म्हणून तिने आपला वाढदिवसाचा केक स्मशानभूमीत कापला होता.
आर्या ही मराठी, हिंदी, इंग्रजी व संस्कृत भाषेवर प्रभुत्व गाजवत असून भगवद्गीता इंग्रजीत भाषांतरित करून ती मुलांना मराठीतून समजावून सांगण्याचे काम देखील करते. आर्याचे शिवचरित्रावरील व्याख्यान हे अत्यंत प्रभावशाली व लोकांना प्रभावित करणारे ठरते आहे.
आर्या कीर्तनात देखील पारंगत असून आळंदीतील ह. भ. प. हरिदास महाराज पालवे यांच्याकडे ती कीर्तनाचे प्रशिक्षण घेत आहे. एवढेच नव्हे तर योगा, गिर्यारोहण व कराटे हे तिचे छंद आहेत. आज पिंपरी चौकात शिवचरित्राचे वाटप करून तिने नवा सामाजिक आदर्श निर्माण करण्याचा प्रयत्न केला असल्याची प्रतिक्रिया अनेक नागरिकांनी व्यक्त केली आहे.








