भिंतीबाहेरची शाळा ः लातूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा अभिनव उपक्रम


निसर्ग शाळेत रमले पळशी जिल्हा परिषद शाळेतील आधुनिक बाल-गोपाळ



लातूर, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – एरवी पुस्तकातून पाहिला जाणारा निसर्ग प्रत्यक्षात अनुभवावा व त्यातून फुले पाखरे अन पर्यावरणाची प्रत्यक्ष माहिती विद्यार्थ्यांना मिळावी, या प्रांजळ हेतून पळशी जिल्हा परिषद शाळेने भरविलेल्या निसर्ग शाळेत विद्यार्थी रमले. भिंतीबाहेरच्या या शाळेने या उपक्रमामागचा उद्देश सफल झाल्याची साक्षच विद्यार्थ्यांच्या चेहर्यावरील निरागस हस्याने दिली.
रेणापूर तालुक्यातील पळशी येथील जिल्हा परिषद शाळेच्या माध्यमातून दरवर्षी नवनवीन उपक्रम घेऊन विद्यार्थ्यांच्या ज्ञानामध्ये भर टाकण्याचे काम शिक्षकांकडून केले जाते. त्या उपक्रमाचाच एक भाग म्हणून शालेय विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच शेती व निसर्गाची माहिती मिळावी,े त्यांच्या ज्ञानाच्या कक्षा मोठ्या व्हाव्यात यासाठी पळशी जिल्हा परिषद शाळेच्या माध्यमातून अनेक उपक्रम घेतले जातात. वर्षभरातील शिक्षणातील आळस दूर व्हावा या दृष्टिकोनातून वार्षीक स्नेहसंमेलन, विविध क्रीडा स्पर्धा, सहल, निसर्ग सहल असे उपक्रम घेतले जातात. या उपक्रमामध्ये आणखी एका उपक्रमाची भर पडावी म्हणून शाळेचे मुख्याध्यापक डी.बी.शेरखाने यांच्या संकल्पनेतून व सहशिक्षक बी.एस.वाघमारे, सहशिक्षक टी.के.स्वामी, अंगणवाडी खाऊ देणार्या ताई अनुताई जाधव यांच्या सहकार्याने पळशी येथील प्रगतशील शेतकरी बापूराव गव्हाणे यांच्या शेतामध्ये निसर्ग सहल काढून निसर्गाच्या सानिध्यातील विविध खेळ, विविध फळझाडांची माहिती व स्नेह भोजन असे उपक्रम घेऊन निसर्ग सहल आणि वनभोजनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणीत करण्यात आलेले आहे.
सकाळी 10.30 वा. आलेल्या विद्यार्थ्यांना सायंकाळी 4.30 पर्यंत निसर्गाच्या सानिध्यात राहून विविध उपक्रमाचा आनंद घेतला. यावेळी या उपक्रमाला मुख्याध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचार्यासह विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. त्यामुळे पळशी येथील जिल्हा परिषद शाळेने घेतलेल्या निगर्स सहलीच्या उपक्रमाचा आनंद विद्यार्थ्यांसाठी आनंददायी ठरणारा आहे.

पारंपरिक खेळाने चिमुकल्यांचा आनंद द्विगुणित
पळशी जिल्हा परिषद शाळेच्या माध्यमातून गुणवत्तेबरोबर सामाजिक बांधिलकी आणि निसर्गाशी नाते जोडण्याचे काम कायम केले आहे. त्यामध्ये सातत्य रहावे ही बाब लक्षात घेऊन मुख्याध्यापक डी.बी.शेरखाने यांनी निसर्ग सहल काढून निसर्गाच्या सानिध्यातील वनभोजन, विविध फळ झाडांची माहिती, निसर्गाच्या सानिध्यातील पारंपरिक खेळ घेऊन विद्यार्थ्यांनी आपला आंनद द्विगुणित करण्याचे काम केलेले आहे. त्यामुळे ही परंपरा जपण्याचे काम शिक्षकांबरोबर विद्यार्थ्यांनी करावे असे आवाहन सहशिक्षीका टी.के.स्वामी यांनी केले.








