हिंदमाता व्याख्यानमालेची सांगता


जगद्गुरू संत तुकाराम महाराजांनी कर्जाच्या खतावण्या इंद्रायणीत बुडवल्या, ही जगातली मोठी क्रांती होती : ह.भ.प. डॉ. सुहास फडतरे



तळेगाव दाभाडे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) -जगद्गुरू संत तुकाराम महाराजांनी कर्जाच्या सर्व खतावण्या इंद्रायणी नदीत बुडवल्या, ही जगातली सर्वात मोठी क्रांतीकारी घटना होती. भ्रष्टाचाराच्या विरोधात त्यांची विचारसरणी होती. दुष्काळात धान्याची गोदामे लोकांसाठी खुली केली. संकटाच्या वेळी महान तत्ववेत्ता पुढे येतो तेव्हा तो लोकांनाही आपलासा वाटतो, असे प्रतिपादन ह.भ.प. डॉ. सुहास फडतरे यांनी केले. दरम्यान, भंडारा डोंगरावरील जगद्गुरू संत तुकाराम महाराज मंदिराच्या बांधकामासाठी एक लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला.
‘न सरे ऐसे ज्ञान – संत तुकाराम’ या डॉ. सुहास फडतरे यांच्या व्याख्यानाने हिंदमाता व्याख्यानमालेची सांगता झाली. वन्यजीवररक्षक मावळ संस्थेला हिंदविजय भूषण पुरस्काराने गौरवण्यात आले. यावेळी भंडारा डोंगर ट्रस्टचेअध्यक्ष ह.भ.प. बाळासाहेब काशीद पाटील, जगन्नाथ नाटक पाटील, संस्थेचे संस्थापक अॅड. रविंद्रनाथ दाभाडे, भिमाजी दाभाडे, प्रशांत ढोरे, पतसंस्थेच्या अध्यक्षा विभावरी दाभाडे, तानाजी काळोखे, श्रीकृष्ण मुळे, श्रीकृष्ण पुरंदरे, सदाशिव धोत्रे, डॉ. रवी आचार्य आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. फडतरे म्हणाले, की संत तुकाराम महाराजांचा प्रत्येक अभंग क्रांतिकारक आहे. तो आपल्याला दान दिलेला आहे. त्यांनी जगाला एवढे दिले आहे, की त्यांचे विचार अमलात आणले तर समाजात अंधश्रद्धा, जातीभेद, विषमता राहणार नाही. त्यांनी कर्जाच्या खतावण्या इंद्रायणी नदीत बुडवल्या. मात्र, त्याचा कुठेही गवगवा केला नाही. गाथेतही याचा उल्लेख आढळत नाही. त्यामुळे दान देताना मनात संकुचित विचार ठेवू नयेत. आपल्याला काहीतरी उरेल हा हेतू मनात ठेवून केलेले दान काय कामाचे ? समाज उद्धारासाठी त्यांनी दान दिले. त्यांच्या एका एका अभंगावर विद्या वाचस्पती पदव्या मिळवल्या आहेत. एवढं महान तत्वज्ञान त्यांनी जगाला दिले आहे. हे दान कधीही न सरणारे आहे, असेही त्यांनी सांगितले.

प्रा. रेवप्पा शितोळे यांनी मानपत्र वाचन केले. सूत्रसंचालन सचिव कैलास भेगडे यांनी, तर आभार प्रकाश गायकवाड यांनी मानले. व्याख्यानमाला यशस्वी होण्यासाठी सुहास धस, शामराव इंदोरे, प्रकाश जाधव, रेवप्पा शितोळे, अशोक गायकवाड यांनी परिश्रम घेतले.








