मृत बांधकाम मजुराच्या वारसास दहा लाख रुपये द्या – काशिनाथ नखाते
जालना जिल्ह्यातील दुर्घटनेतील दोषीवर कठोर कारवाई करावी


पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) -महाराष्ट्रातील कामगारांचे जीवन धोक्यात असून राज्यातील अवैध वाळू वाहतूक तसेच निष्काळजीपणाचा कळस म्हणजे जालना जिल्ह्यातील झालेली दुर्घटना होय , दिवसभर काम करून रात्रीच्या वेळी झोपलेल्या निष्पाप कामगारांच्या अंगावरती अवैध वाळू टिपरने टाकली गेली आणि त्याखाली दबून मृत्युमुखी पडलेल्या ५ कामगारांच्या वारसांना १० लाख रुपये अर्थसहाय्य करावे तसेच यात ठेकेदार ,ट्रकचालक दोषीवर कडक कारवाई करण्याची मागणी कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व कामगार मंत्री यांच्याकडे आज केली.



कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्र तर्फे निवेदनात म्हटले आहे की
पिसोळी चांडोळ रस्ता तालुका जाफराबाद,जिल्हा जालना रस्त्यावरिल पुलाच्या बांधकामासाठी आलेल्या मजुरांच्या राहण्याच्या पत्र्याचे शेडवर मध्ये अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या हायवा ट्रकने मजूर झोपलेल्या पत्र्याच्या शेडवर वाळू टाकत अख्खा ट्रक रिकामा केल्याने त्याखाली दबून निष्पाप ५ मजुरांचा हकनाक बळी गेला हे अत्यंत दुर्दैवी घटना असून अशा प्रकारच्या घटना रोखण्याची गरज आहे.

यामध्ये दोषी असणारा ठेकेदार त्याचे सुपरवायझर व वाहन चालक यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा तर दाखल झालाच पाहिजे. मात्र सदरच्या दुर्घटनेत मृत गणेश घनवई, भूषण घनवई, सुनील सपकाळ, सुपडू आहेर, राजेंद्र वाघ या मृत्युमुखी पडलेल्या ५ कामगारांच्या वारसांना प्रत्येकी १० लाख रुपये अर्जसहाय्य देण्यात यावे.
भविष्यामध्ये अशा घटना घडणार नाहीत व निष्पाप कामगारांचे मृत्यू होणार नाही याची खबरदारी सरकारने घेत त्यासाठी जनजागृती करावी अशी मागणीही कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी केली आहे .








