पिंपरी चिंचवड शहरातील खाजगी “आरओ” प्लॅन्टसवरील निर्बंध हटवण्याचा निर्णय


पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील काही भागांमध्ये जीबीएसचे रुग्ण आढळून आल्याने, या भागातील ५८ खाजगी रिव्हर्स ऑस्मोसिस (आरओ) प्लॅन्ट्स पूर्वी बंद करण्यात आले होते. मात्र, पिण्याच्या शुद्ध पाण्याची गरज लक्षात घेऊन महानगरपालिकेने ठराविक अटी व शर्तींसह या प्लॅन्ट्सना पुन्हा सुरू करण्यास परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी काही अटी व शर्तींची पूर्तता करणे आवश्यक आहे. याबाबत आयुक्त शेखर सिंह यांनी स्वतंत्र आदेश निर्गमित केले आहेत.



महानगरपालिकेच्या अटी व शर्ती:

१) खाजगी “आरओ” प्लॅन्ट चालक (Reverse Osmosis Plant Operator) यांनी महानगरपालिकेकडे रीतसर नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रांसह संबंधित प्रभागातील कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा यांचेकडे अर्ज करावा.
२) खाजगी “आरओ” प्लॅन्ट मालक किंवा चालक यांनी तातडीने त्यांच्या मूळ उत्पादक कंपनीकडून किंवा प्लॅन्ट दुरूस्त करणारी संस्था यांचेकडून संपूर्ण “आरओ” प्लॅन्टसची देखभाल दुरूस्ती करून घेऊन त्याबाबतचा प्रत्येक ६ महिन्यांनी दाखला संबंधित कंपनीकडून घ्यावा. तसेच देखभाल दुरूस्तीचे प्रत्यक्ष काम सुरू असतानाचे सुस्पष्ट, तारीख, वेळ व जियो टॅगसह फोटो काढावेत.
३) मुख्य उत्पादक कंपनी किंवा प्लॅन्ट देखभाल-दुरूस्त करणारी संस्था यांचेकडून सदर प्लॅन्टच्या आउटलेटचे पाणी मानक, IS -10500 (2012) व WHO च्या मार्गदर्शक तत्वानुसार शुध्दीकरण करण्यासाठी प्लॅन्ट योग्य प्रकारे कार्यान्वित असल्याचा दाखला सादर करावा.
४) राज्य सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा, पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रयोगशाळेकडून सदर “आरओ” प्लॅन्टद्वारे येणारे पाणी पिण्यास योग्य असल्याबाबत दर महिन्याला स्रोतामधील पाणी व शुद्ध केलेले पाणी यांची गुणवत्ता तपासणी करावी व टेस्ट रिपोर्ट त्यांचेकडून प्राप्त करून घ्यावा व तो प्रभागात सादर कारावा.
५) या “आरओ” प्लॅन्टसाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे पाणी वापर करत असल्यास सदर नळजोड नियमान्वित करून, बिगर घरगुती दराने मीटरनुसार त्या पाण्याचे बिल महानगरपालिकेकडे भरावे. तसे न केल्यास कनेक्शन व आरओ प्लॅन्ट कायमस्वरूपी बंद केले जाईल.
महानगरपालिकेच्या या निर्णयामुळे नागरिकांना शुद्ध व योग्य प्रमाणात पाणी उपलब्ध होण्यास मदत होईल. तरी, संबंधित आरओ प्लॅन्ट धारकांनी महापालिकेने दिलेल्या अटी व शर्ती आणि नियमांचे पालन करून अधिकृत परवानगी घेऊनच आरओ प्लॅन्ट्स सुरू ठेवावेत.
– प्रमोद ओंभासे, मुख्य अभियंता, पाणीपुरवठा विभाग, पिंपरी चिंचवड महानगरपालिका








