पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयोजित पवनाथडी जत्रेला नागरिकांना उदंड प्रतिसाद
खवय्यांसाठी"पवनाथडी जत्रा" म्हणजे महाराष्ट्राच्या समृद्ध खाद्यपरंपरेचा जिवंत अनुभव!


सांगवी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)- स्वादिष्ट व रुचकर खाद्यपदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी उसळलेली खवय्यांची गर्दी आणि शोभेच्या वस्तू, विविध प्रकारचे वस्त्र आणि महिलांची आभूषणे, लहान मुलांची खेळणी व फॅन्सी ड्रेस, विविध पुस्तकांचे स्टॉल्स तसेच मसाल्याचे पदार्थ आणि गृहउपयोगी व चैनीच्या वस्तू खरेदीसाठी मोठा जनसागर पवना थडी जत्रेत आलेला पहायला मिळाला. याशिवाय विशेष सांस्कृतिक कार्यक्रमांसाठीही मोठ्या संख्येने प्रेक्षक उपस्थित होते.



सांगवी येथील पीडब्लूडी मैदानावर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या समाज कल्याण विभागामार्फत पवनाथडी जत्रेचे आयोजन कारण्यात आले आहे. यामध्ये शनिवारी (२२ फेब्रुवारी ) सायं. ६ वाजता ‘मेरा भारत महान’ या सदाबहार हिंदी, मराठी गाण्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादर झाला. यावेळी मेरा भारत महान या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या सुरवातीला सीमेवर उभे राहून प्रत्येक भारतीयांचे रक्षण करणाऱ्या सैनिकांना समर्पित करण्यासाठी ‘तू मेरा कर्मा तू मेरा धर्मा’ हे गाणे सादर करण्यात आले.

यावेळी मराठी गाण्याची सुरवात नीलकंठ मास्तर चित्रपटातील ‘अधीर मन झाले’ या गाण्याचे करण्यात आली. तर हिंदी गाण्याची सुरवात ‘केसरिया तेरा इश्क है’ या गाण्याने करण्यात आली. याशिवाय पुढील कार्यक्रमात अनेक हिंदी मराठी गाणी गाण्यात आली.
यावेळी समाज विकास विभागाचे सहाय्यक आयुक्त तानाजी नरळे, समूह संघटक रेश्मा पाटील यांच्यासह महानगरपालिका कर्मचारी व मोठया संख्खेने उपस्थित असलेल्या शहरातील नागरिक कार्यक्रमचा आनंद घेतला.
पवना थडी जत्रेत खवय्यांनी मांसाहारी व शाकाहारी पदार्थांचा घेतला आस्वाद
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आयोजित “पवना थडी जत्रा” खवय्यांसाठी खास पर्वणी ठरली. सामिष खवय्यायांसाठी विविध प्रकारच्या चिकन, मटण आणि फिश पदार्थांनी जत्रेची रंगत वाढवली. खाद्यप्रेमींनी या चविष्ट पदार्थांवर मनसोक्त ताव मारला.
फक्त मांसाहारी नव्हे, तर महाराष्ट्राच्या विविध भागांतील पारंपरिक शाकाहारी पदार्थांचाही खवय्यांनी तितकाच मनमुराद आनंद घेतला.
कोल्हापुरी तांबडा-पांढरा रस्सा, मालवणी करी,सी फूड, विदर्भाचा झुणका-भाकरी, पुणेरी मिसळ, खानदेशी वांग्याचं भरीत, कोकणी नारळीभात, नागपुरी तार्री पोहे यांसारख्या अस्सल पदार्थांनी जत्रेला खास रंगत आणली.
या जत्रेला स्थानिक नागरिक तसेच परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. खाद्यसंस्कृती जपणारी ही जत्रा महाराष्ट्रातील पारंपरिक आणि चविष्ट पदार्थांचा उत्सव ठरली.
महिलांच्या सक्षमीकरणासाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका पालिका दरवर्षी सांगवी येथे ‘पवनाथडी’ जत्रेचे आयोजन करत असते. सोमवार (२४फेब्रुवारी ) पर्यंत चालणाऱ्या जत्रेत शहरवासियांनी सहभागी व्हावे व आपल्या शहरातील महिलांना आर्थिक सक्षम करण्यासाठी सहकार्य करावे.
शेखर सिंह
आयुक्त तथा प्रशासक
पिंपरी चिंचवड महानगरपालिका
समाज कल्याण विभागाच्या वतीने यंदा पवनाथडी जत्रेत ७५० हुन अधिक स्टॉल महिलांना आपल्या वस्तू व खाद्य पदार्थ विक्री साठी उपलब्ध करून देण्यात आले आहेत.यासोबतच नागरिकांच्या मनोरंजनासाठी आयोजित विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचा देखील नागरिकांनी अवश्य लाभ घ्यावा
तानाजी नरळे
सहाय्यक आयुक्त
समाज विकास विभाग
पिंपरी चिंचवड महानगरपालिका








