पाच दिवसीय शिवशंभो महाशिवरात्री महोत्सव आजपासून


पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – शिवशंभो फाउंडेशनच्या वतीने रविवार, दिनांक २३ फेब्रुवारी ते गुरुवार, दिनांक २७ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत पाच दिवसीय शिवशंभो महाशिवरात्री महोत्सव २०२५चे शाहूनगर, चिंचवड येथे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये तीन दिवसीय शिवशंभो व्याख्यानमाला, शिवशंभो कार्यभूषण आणि कार्यगौरव पुरस्कार वितरण सोहळा, चित्रकला – रांगोळी – विविध गुणदर्शन आणि समूहगान स्पर्धा, भजन – कीर्तन, शिवलीलामृत ग्रंथ पारायण, ओंकार संगीत संध्या-अभंग व भक्तिगीते, महाप्रसाद अशा वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची पर्वणी आयोजित करण्यात आली आहे.



खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश लांडगे, शंकर जगताप, अण्णा बनसोडे, उमा खापरे, अमित गोरखे, सदाशिव खाडे, अभय कोटकर, आयुक्त शेखर सिंह, बापूसाहेब बांगर, राजेश खन्ना, नितीन काकडे, अनुराधा गोखले, तुषार हिंगे, मंगला कदम, योगिता नागरगोजे, नारायण बहिरवाडे, महेश चांदगुडे, शिवाजी आखाडे, सुप्रिया चांदगुडे, डॉ. जयकुमार गुंजकर, आबासाहेब नागरगोजे, भाऊसाहेब पाटील, योगेश बाबर, किशोर सोमवंशी, शिशुपालसिंह तोमर, नंदकुमार साळुंखे, सोमनाथ खेडेकर अशा राजकारण, समाजकारण, प्रशासन आणि औद्योगिक क्षेत्रातील मान्यवरांची महोत्सवात प्रमुख उपस्थितीत राहणार आहे.

शिवशंभो व्याख्यानमालेत रविवार, २३ फेब्रुवारी रोजी आशिष कलावार आणि रिता कलावार दाम्पत्य ‘विज्ञान व अध्यात्म’ या विषयावरील प्रथम पुष्प गुंफतील. सोमवार, २४ फेब्रुवारी रोजी निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन ‘भारतापुढील संरक्षणाची आव्हाने’ या विषयावर ऊहापोह करतील; तर मंगळवार, २५ फेब्रुवारी रोजी डॉ. संजय कळमकर ‘जगण्याच्या आनंदी वाटा’ या विषयावर श्रोत्यांशी हितगुज साधतील. तिन्ही व्याख्याने सायंकाळी साडेसात वाजता सुरू होतील. बुधवार, दिनांक २६ फेब्रुवारी २०२५ रोजी माजी आमदार ॲड. गौतम चाबुकस्वार यांना शिवशंभो कार्यभूषण तसेच उद्योजक महेंद्र पाटील आणि सिंधू बंडगर यांना शिवशंभो कार्यगौरव पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. गुरुवार, दिनांक २७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत भाविकांना महाप्रसादाचा लाभ घेता येईल. विनामूल्य असलेल्या या महाशिवरात्री महोत्सवात सर्व नागरिकांनी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन शिवशंभो फाउंडेशनचे संस्थापक केशव घोळवे आणि अध्यक्ष संजय तोरखडे यांनी केले आहे.








