मेदनकरवाडीत श्री खंडोबा महाराजांचा उत्सव उत्साहात


आळंदी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – श्री खंडोबा देवस्थान ट्रस्ट, मेदनकरवाडी मध्ये श्रींचे मंदिरात श्री खंडोबा महाराजांचा उत्सव उत्साहात सुरू करण्यात आला. रथ सप्तमी दिनी परंपरेने मानाचे गाडा पूजन झाले. श्री खंडोबा महाराजांचे उत्सवा निमित्त परंपरेने विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याचे श्रींचे पुजारी अरुण तोडकर यांनी सांगितले.
उत्सव निमित्त श्रींचे मंदिरावर लक्षवेधी विद्युत रोषणाई, पुष्प सजावट करण्यात आली आहे. श्री खंडोबा महाराज यांचा पुष्प सजावटीने सजलेला वैभवी मानाचा गाडा पुजन, भंडार वाहत पूजा देखील उत्साहात झाली. यावेळी भाविकांनी दर्शनास गर्दी केली. रांगा लावून श्रींचे तसेच मानाचा गाडा दर्शन घेतले.
श्री खंडोबा महाराज यांचे सेवेकरी म्हणून चऱ्होली, कुरूळी आणि चाकण या परिसरातून मानकरी येत असतात. राज्यातून भाविक नवसाचा देव पावतो म्हणून येत असतात. पहाटे पाच वाजल्या पासून ते संध्याकाळी श्री खंडोबा महाराज यांची पुजा व देवाची पदे रथ सप्तमी दिनी गायली गेल्याचे सामाजिक कार्यकर्ते नवनाथ भुजबळ यांनी सांगितले.
श्री खंडोबा महाराज मंदिराचे सेवेकरी अरूण तोडकर आणि गावातील लहान, थोर मंडळी रथसप्तमी ते माघ पौर्णिमा पर्यंत देवाची परंपरेने पूजा करतात. रथसप्तमी दिनी श्रींची पूजा, आरती झाल्या नंतर भाविकांना अन्नदान महाप्रसादचे वाटप करण्यात आले. श्री खंडोबा महाराज यांचा मानाचा गाडा रथ सप्तमी दिनी परंपरेने पुजन झाल्या नंतर उत्सवातील कार्यक्रम सुरू होतात.



रथसप्तमी ते माघ पौर्णिमा श्री खंडोबा महाराजांचा उत्सव या नऊ दिवसांमध्ये गाड्या ला भाविक पाणी घालण्याची परंपरा कायम जतन केली आहे. मेदनकरवाडीतील श्री खंडोबा देवस्थान राज्यात सर्व परिचित प्रसिद्ध श्रीक्षेत्र आहे. मेदनकरवाडीत श्री खंडोबा मंदिरा समोर रथ सप्तमी निमित्त बैल गाडा पूजन तसेच भाविकांनी दर्शनास गर्दी करून प्रथा परंपरांचे पालन करीत श्री खंडोबा महाराजांचा उत्सव परंपरेने सुरु झाला होता.
श्री खंडोबा महाराजांचा मुख्य उत्सव माघ पौर्णिमा दिनी साजरा झाला. त्या निमित्त पहाटे ४ ते ६ श्रींची महापूजा, दुपारी महाआरती, त्या नंतर बैलगाड्यांची मिरवणूक, सायंकाळी पाचच्या सुमारास बारा गाड्यांचा परंपरेने येळकोट येळकोट, जय मल्हारचे गजरात उत्सव साजरा झाला. मेदनकरवाडी ग्रामस्थासाठी विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम होत आहेत. यात चितपट कुस्त्यांचा जंगी आखाडा आणि सांस्कृतिक कार्यक्रम देखील होत आहे. पंचक्रोशीतील गावाचे बैलगाडे, पैलवान, नागरिक, भाविकांनी या उत्सवास उपस्थित राहावे असे आवाहन ग्रामस्थ आणि ट्रस्टचे वतीने करण्यात आले होते.यास परिसरातून मोठा प्रतिसाद मिळाला. माघी पौनिमा निमित्त मेदनकरवाडी येथील श्री खंडोबाचा उत्सव उत्साहात परंपरेने साजरा झाला.यावेळी मंदिरांसह परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई, पुष्प सजावट करण्यात आली होती. भाविकांनी मोठ्या उत्साहात तळी भांडार केला. आरती, अभिषेक,पूजा उत्साहात झाली. माघ पौर्णिमे निमित्त यात्रा परंपरेने साजरी झाली. यावेळी बारा गाड्यांचे पूजन झाले. भाविक, नागरिकांची श्रींचे दर्शनास आणि बारा गाडे उत्सव पाहण्यास मोठी गर्दी झाली होती. पंचक्रोशीतील भाविक श्रींचे दर्शनास आले होते. मेदनकरवाडी ग्रामपंचायत आणि ग्रामस्थ तसेच श्री खंडोबा मंदिर देवस्थान पदाधिकारी यांनी चोख नियोजन करून उत्साहात रंग भरला. उत्सवाचे नियोजन प्रमाणे यशस्वी उत्सव होण्यास परिश्रम घेतले.









