शब्दधन काव्यमंच आयोजित साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी आमदार शंकर जगताप


पिंपळे गुरव, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – शब्दधन काव्यमंच ही साहित्य संस्था रौप्यमहोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहे. यानिमित्त संस्थेच्या वतीने या वर्षात विविध साहित्यिक उपक्रम होणार आहेत. तसेच “शब्द हे आमुच्या जिवींचे जीवन” हे साहित्य संमेलन घेण्यात येणार आहे. या नियोजित साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष म्हणून चिंचवड विधानसभेचे आमदार शंकर पांडुरंग जगताप यांची संस्थेच्या वतीने एकमुखाने निवड करण्यात आली. याप्रसंगी गुरुवर्य राघवचैतन्य महाराज यांच्या हस्ते संत तुकाराम महाराज पगडी, शाल, तुकोबाराय यांची अभंगगाथा देऊन शंकर जगताप यांचा सन्मान करून त्यांना स्वागताध्यक्ष निवडीचे पत्र देण्यात आले. शब्दधन काव्यमंचाच्या बोधचिन्हाचे अनावरण शंकर जगताप आणि गुरुवर्य ह. भ. प. राघव चैतन्य महाराज यांच्या हस्ते ‘बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल’ या घोषात करण्यात आले. याप्रसंगी ह. भ. प. अशोक महाराज गोरे, मुरलीधर दळवी, जयश्री गुमास्ते, अण्णा गुरव, शब्दधन काव्यमंचाचे अध्यक्ष सुरेश कंक, सागर आंघोळकर, सखाराम नखाते, संजय दीक्षित उपस्थित होते.



संस्थेचे अध्यक्ष सुरेश कंक यावेळी म्हणाले की, ‘गेल्या पंचवीस वर्षांपासून पिंपळे गुरव – सांगवी परिसरातील शब्दधन काव्यमंच ही साहित्य संस्था साहित्यसेवा करीत आहे. वैकुंठवासी आमदार लक्ष्मण जगताप आणि शंकर जगताप हे कायम साहित्यिक, सांस्कृतिक चळवळ पिंपळे गुरव, सांगवी आणि परिसरात रुजावी यासाठी शब्दधन काव्यमंच या संस्थेला आधार देत आले आहेत. शब्दधन काव्यमंच शहरातील सर्व साहित्यिकांना तसेच विविध साहित्य संस्थांना सोबत घेऊन रौप्यमहोत्सव साजरा करणार आहे.

शंकर जगताप यांनी, ‘शब्दांचे धन जनलोका’ देण्यासाठी कटिबद्ध असलेली शब्दधन काव्यमंच ही संस्था रौप्यमहोत्सवात पदार्पण करीत आहे याचा आनंद वाटतो; तसेच गुरुवर्य हरिभक्त परायण राघव चैतन्य महाराज यांच्या हस्ते मला सन्मानित केल्याचा आनंद वाटला.’ अशी भावना व्यक्त केली. शंकर जगताप यांच्या हस्ते ह. भ. प. राघव चैतन्य महाराज यांनाही शब्दधन काव्यमंचाच्या वतीने सन्मानित करण्यात आले.








