संकष्ट चतुर्थीच्या दिवशी धार्मिक, सामाजिक उपक्रमांनी संजीवन समाधी महोत्सवाचा दुसरा दिवस गाजला
चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – श्रीमन् महासाधू श्री मोरया गोसावी महाराज संजीवन समाधी महोत्सवाच्या 462 व्या वर्षाच्या दुसऱ्या म्हणजेच संकष्ट चतुर्थीच्या दिवशी विविध धार्मिक व सामाजिक उपक्रम व कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते, यामध्ये हजारो भाविकांनी व नागरिकांनी सहभाग घेतला.
चिंचवड येथील महासाधू श्रीमोरया गोसावी महाराज संजीवन समाधी मंदिर व श्रीमंगलमूर्ती वाडा येथे, 29 डिसेंबर 2023 ते 2 जानेवारी 2024 या कालावधीत श्रीमन् महासाधू श्रीमोरया गोसावी महाराज संजीवन समाधी महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाच्या दुसर्या दिवसाची सुरुवात सकाळी 6 वाजता नितीन दैठणकर यांच्या सनई वादनाने झाली. या कार्यक्रमाला जेष्ठ भाविकांची संख्या उल्लेखनीय होती.
त्यानंतर सोहम् योग साधना वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये शेकडो नागरिकांनी सहभाग नोंदवत योग प्राणायाम केले.
संस्कृती संवर्धन विकास महासंघ व पिंपरी चिंचवड येथील स्थानिक शाळेतील विद्यार्थ्यांनी व सुमारे 450 भाविकांनी सामूहिक अथर्वशीर्ष पठणात भाग घेतला. अथर्वशीर्ष पठणाने परिसरात चैतन्य संचारले.
यानंतर माजी नगरसदस्या अश्विनी चिंचवडे संचलित सामूहिक अभिषेक घेण्यात आले, याचा सुमारे 150 भाविकांनी लाभ घेतला. तसेच वेदमूर्ती चंद्रशेखर रबडे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली श्री लक्ष्मी विनायक याग संपन्न झाला.
राजू शिवतरे यांचे रक्तदान शिबिर देखील सकाळी 9 ते सायंकाळी 6 या वेळेत पार पडला. या शिबिरात 150 भाविकांनी रक्तदान केले.
लक्ष्मीप्रसाद शंकरराव कुलकर्णी यांच्या नारदीय कीर्तनाने सायंकाळच्या सत्राची सुरुवात झाली. कीर्तनात भाविक रमून गेल्याचे चित्र पाहायला मिळाले.
यानंतर प्रिया जोग यांनी समस्त सृष्टीचे चालक भगवान श्री महाविष्णू यांचे श्री विष्णू सहस्त्रनाम या विषयावर प्रवचन व श्री विष्णू सहस्त्रनामाचे पठण केले. सहस्त्रनाम पठण कार्यक्रमाला भाविकांची मोठी गर्दी झाली.