“… जगायची असते कविता! – शिवाजी चाळक


“… जगायची असते कविता! – इंजि. शिवाजी चाळक
तिसरे इंद्रायणी साहित्य संमेलन



पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) –
“साठवायची नसते कविता
तर जगायची असते कविता!”

अशा मार्मिक शब्दांतून कवितेतून कवितेवर भाष्य करीत शिवांजली साहित्यपीठाचे संस्थापक – अध्यक्ष आणि ज्येष्ठ कविवर्य इंजि. शिवाजी चाळक यांनी कवयित्री बहिणाबाई चौधरी साहित्यनगरी, जयगणेश बॅंक्वेट हॉल, नवीन देहू – आळंदी रस्ता, मोशी येथे रविवारी (दि. 5)तिसऱ्या एकदिवसीय इंद्रायणी साहित्य संमेलनात कवींचे प्रबोधन केले.
निमंत्रितांच्या कविसंमेलनात अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना इंजि. शिवाजी चाळक बोलत होते. शब्दधन काव्यमंचाचे संस्थापक – अध्यक्ष सुरेश कंक, इंद्रायणी साहित्य संमेलनाध्यक्ष दादाभाऊ गावडे, निमंत्रक अरुण बोऱ्हाडे, स्वागताध्यक्ष वंदना आल्हाट, परिषदेचे अध्यक्ष संदीप तापकीर यांची प्रमुख उपस्थिती होती. पिंपरी – चिंचवड परिसर, पुणे आणि महाराष्ट्राच्या अन्य भागांतून सुमारे ५२ कवी सहभागी झाले होते.
शिवाजी चाळक पुढे म्हणाले की, “ध्येयवेडी माणसेच इतिहास निर्माण करू शकतात, ही प्रचिती या इंद्रायणीच्या परिसराने घेतली आहे. ज्ञानेश्वरमाउलींनी ज्या रेड्यामुखी वेद वदविले तो समाधी परिसर, तुकोबाराय यांना अनुग्रह देणाऱ्या बाबाजी चैतन्य यांचे वास्तव्य आणि तुकोबांचे अभंग ज्या जुंदरी कागदावर लिहिले गेले तो जुन्नरचा परिसर आणि इंद्रायणीचा परिसर यांचा ऋणानुबंध प्राचीन काळापासून आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा ज्या ऐतिहासिक पुराव्यांच्या आधारे मिळाला तो नाणेघाटातील शिलालेख हादेखील जुन्नर परिसरातीलच आहे. त्यामुळे कविसंमेलनाचे अध्यक्षपद हा त्या शिलालेखाचा गौरव आहे, अशी माझी विनम्र भावना आहे. काव्यक्षेत्रात आता झटपट क्रिकेटप्रमाणे आय. पी. एल. अर्थात इन्स्टन्ट पोएट्री लिटरेचर हा अनिष्ट पायंडा रूढ होत आहे; परंतु वाचन अन् श्रवणभक्ती ही कवितेला प्रगल्भतेकडे नेते!”
ज्येष्ठ कवी सुरेश कंक यांनी ‘कृष्णार्पण’ या आध्यात्मिक आशयाच्या कवितेचे प्रभावी सादरीकरण करीत उपस्थितांना अंतर्मुख केले.
कविसंमेलनात निसर्ग, प्रेम, देशभक्ती, मातृत्व, सामाजिक जाणिवा, स्त्रीजाणिवा, दांभिकता, प्रतारणा, मधुराभक्ती, राजकीय असंवेदनशीलता अशा वैविध्यपूर्ण आशयविषयांच्या आणि अभंग, पोवाडा, पाळणा, ओवी, गझल, मुक्तच्छंद या भिन्न काव्यप्रकारातील रचनांनी उत्तरोत्तर रंगत आणली. संतोष घुले यांनी चपखल काव्यपंक्ती, शेरोशायरी उद्धृत करीत सुमारे दोन तास बहारदार सूत्रसंचालन केले. सहभागी कवींना प्रमाणपत्र, मानवस्त्र, गुलाबपुष्प प्रदान करून सन्मानित करण्यात आले. इंद्रायणी साहित्य परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी संयोजन केले. डॉ. पौर्णिमा कोल्हे यांनी आभार मानले.








