अरविंद एज्युकेशनच्या विद्यार्थ्यांनी घेतली व्यसन न करण्याची शपथ


शालेय वयातच विद्यार्थ्यांना व्यसनाचे दुष्परिणाम समजून सांगणे गरजेचे



‘पेस’ संस्थेतर्फे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – व्यसन म्हणजे काय ? व्यसनाचे दृष्टचक्र कसे असते, त्या चक्रामध्ये एकदा अडकले की त्याचे होणारे दुष्पपरिणाम… म्हणून व्यसनापासून कसे दूर राहता येईल, ही माहिती देतानाच ‘मी स्वतः व्यसन करणार नाही आणि दुसऱ्यांनाही व्यसन करू देणार नाही’, अशी विद्यार्थ्यांनी शपथ घेतली. दरम्यान, शालेय वयातच विद्यार्थ्यांना व्यसनाचे दुष्परिणाम समजून सांगितल्यास त्यांचे जीवन उज्ज्वल बनल्याशिवाय राहणार नाही.

निमित्त होते, अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या भारतीय विद्यानिकेतन विद्यालयामध्ये इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी व्यसनमुक्तीवर आधारित व्याख्यानाचे. आज समाजात वावरत असताना विद्यार्थ्यांना अनेक बाह्य गोष्टी आकर्षित करीत असतात आणि विद्यार्थी या गोष्टींना बळी पडू लागतात, यासाठी त्यांना शाळेमधूनच अशा गोष्टींपासून दूर ठेवण्यासाठी ‘पेस’ या संस्थेच्या माधुरी पेंढारकर व वैशाली गाडेकर यांनी मार्गदर्शन केले. दरम्यान, ‘वळण’ ही फिल्म विद्यार्थ्यांना दाखविण्यात आली. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा आरती राव, सचिव प्रणव राव, मुख्याध्यापिका आशा घोरपडे, पर्यवेक्षिका स्मिता बर्गे, भटू शिंदे, उदय फडतरे आदी उपस्थित होते.
माधुरी पेंढारकर व वैशाली गाडेकर यांनी शिक्षक, विद्यार्थ्यांशी संवाद साधून व्यसनमुक्तीबाबत सखोल मार्गदर्शन केले. व्यसनाचे दुष्परिणाम पटवून देतानाच स्वत:च्या आणि शाळेसह परिसराच्या स्वच्छतेचेही महत्त्व त्यांनी सांगितले. यावेळी व्यसनाबाबत स्वत:शी संवाद साधण्याचे आवाहनही त्यांनी विद्यार्थ्यांना केले. त्यांच्या या आवाहनानुसार आचरण करण्याची ग्वाही विद्यार्थी, शिक्षकांनी दिली.
आरती राव यांनी सांगितले, विद्यार्थ्यांना भरपूर शिकण्याचे, शिक्षणातून स्वत:चे भवितव्य घडविण्याचे व्यसन जडायला हवे. परंतु दुर्दैवाने आज अनेकजण व्यसनाच्या आहारी जाऊन आपले उज्ज्वल भवितव्य अंधःकारमय करीत असल्याचे चित्र आहे. विद्यार्थ्यांमध्ये व्यसनाच्या तोट्याबाबत वेळीच जागरूकता निर्माण करणे गरजेचे आहे.
प्रणव राव यांनी बदलती जीवनशैली, नात्यांमध्ये अंतर, पालकांनी मुलांकडे केलेले दुर्लक्ष, अतिस्वातंत्र्य किंवा मुलांचे टोकाचे लाड, घरातील मोठ्यांनी मुलांसमोरच व्यसन करणे, आर्थिक दुर्बलता, व्यसनाच्या नशेत वडिलांकडून आईला होणारी मारहाण, अभ्यास जमत नाही किंवा नापास झाल्यामुळे, कमी गुण मिळत असल्याने आलेला तणाव, अशी अनेक कारणे मुलांना व्यसनाच्या जाळ्यात ओढण्यास कारणीभूत ठरत आहेत. त्यामुळे शालेय वयातच विद्यार्थ्यांना व्यसनाचे दुष्परिणाम समजून सांगितल्यास त्यांचे जीवन उज्ज्वल बनल्याशिवाय राहणार नाही.
प्रास्ताविक मुख्याध्यापिका घोरपडे यांनी, तर पर्यवेक्षिका स्मिता बर्गे यांनी आभार मानले.








