ताज्या घडामोडीचिंचवडपिंपरी
संत शिरोमणी नामदेव महाराजांचा ६७४ वा संजीवन समाधी सोहळा उत्साहात संपन्न
पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी – चिंचवड नामदेव महाराज मंदिर व सांस्कृतिक भवन आयोजित ६७४ वा संजीवन समाधी सोहळा समाजबांधवांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.
सोहळ्याची सुरुवात सकाळी नामदेवरायांच्या मूर्तीस संस्थेचे अध्यक्ष एकनाथ सदावर्ते यांच्या हस्ते अभिषेकाने झाली. त्यानंतर समाजातील नवोदित दांपत्यांच्या हस्ते सत्यनारायण महापूजा करण्यात आली. त्यावेळेस नऊ दिवस चाललेल्या गाथा पारायणाचीदेखील सांगता करण्यात आली.
पालखी मिरवणूक सोहळा श्री मोरया गोसावी गणपती मंदिरातून ठीक दहा वाजता सुरू होऊन प्रस्थापित मार्गाने पालखीचे आगमन ठीक पावणे बारा वाजेच्या सुमारास नामदेवमहाराज मंदिरात झाले. पालखी मार्गावर भक्तांकडून उत्साहाने पालखीचे स्वागत करण्यात आले. त्याचबरोबर वरुणराजानेही पालखीचे स्वागत केले. चाफेकर चौकात तसेच नामदेवमहाराज चौकात भक्तांनी फेर धरून नामदेवमहाराजांचा घोष करत स्त्री-पुरुषांनी उत्साहाने फुगडीचा खेळदेखील केला. यावेळेस खास आळंदीहून आलेल्या वारकरी वेशातील भजनीमंडळ समूहाने उत्तम रीतीने भजन आणि नामदेवरायांचा गजर करत पालखी सोहळ्याची शोभा द्विगुणित केली. यावेळी पुरुषोत्तम निकते संत नामदेवांच्या वेशभूषेत पालखी सोहळ्यात सामील झाले होते; तसेच काही बालभाविक आणि महिलावर्गदेखील पारंपरिक वेशभूषा करून सामील झाले होते.
मंदिरात पालखीचे आगमन झाल्यानंतर भजन आणि आरती होऊन सर्व समाजबांधवांकडून नामदेव मूर्तीवर पुष्पवृष्टी करण्यात आली. यानंतर नामदेव सांस्कृतिक सभागृहात संस्थेच्या अहवालाचे इतिवृत्त वाचन करण्यात आले. अध्यक्ष एकनाथ सदावर्ते यांनी आपले मनोगत व्यक्त करत समाजाच्या प्रगतीच्या अनुषंगाने विविध मुद्द्यांवर सविस्तर मार्गदर्शन केले. त्यावेळी समाजातील दानशूर देणगीदारांचा मंदिरातील नामदेव महाराजांची प्रतिमा असलेले स्मृतिचिन्ह प्रदान करून यथोचित सत्कार करण्यात आला. सत्कारानंतर समाजातील अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले आणि पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. सोहळ्याचे विशेष आकर्षण म्हणजे समाजातील प्रसिद्ध युवा शाहीर शुभम भुतकर याने उत्कृष्ट पोवाड्याचे सादरीकरण करीत सर्वांची मने जिंकली. संस्थेतर्फे सर्व समाजबांधवांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. दिवसभर पावसाची उपस्थिती असतानादेखील सुमारे सहाशे भाविकांनी या सोहळ्याचा लाभ घेतला. यामध्ये समाजातील विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांची विशेष उपस्थिती होती; तसेच पुण्याहून नामदेव समाजोन्नती परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनीदेखील उपस्थित राहून सदिच्छा भेट दिली.
शेवटच्या सत्रात प्रथेप्रमाणे संस्थेची सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये मागील कार्याचा आढावा घेतला गेला आणि नवीन कार्यकारणीची निवड करण्यात आली. सर्वानुमते मागील वर्षाची कार्यकारणी पुन्हा नियुक्त करण्यात आली. यंदाच्या नवीन वर्षाच्या कार्यकारणीत काही महिला प्रतिनिधींचीदेखील नियुक्ती करण्यात आली आहे. नामदेवरायांच्या पसायदानाने सोहळ्याची सांगता करण्यात आली.