महानगरपालिकेने फेरीवाला कायद्याची अंमलबजावणी करावी – काशिनाथ नखाते
चिंचवडला हातगाडी,स्टॉलवरील कारवाईला विरोध
पिंपरी , (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अधिकारी फेरीवाला कायद्याची अंमलबजावणी न करता नोंदणीकृत आणि विना नोंदणीकृत अशा सर्वच विक्रेत्यावरती कारवाईचा बडगा उगारलेला आहे. रस्ता शुशोभीकरण आणि स्मार्ट सिटीच्या नावाखाली असं गोरगरिबांना चिरडून टाकणं आणि त्यांचे साहित्ये जप्त करणे अत्यंत चुकीचे असून महानगरपालिकेने फेरीवाला कायद्याची अंमलबजावणी करावी अन्यथा पुन्हा आंदोलन करण्यात येईल असा इशारा फेरीवाला क्रांती महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते यांनी दिला.
चिंचवड स्टेशन मोहननगर येथे विक्रेत्यांनी एकत्र येऊन मनपा कारवाईस विरोध केला.यावेळी महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते, नीमंत्रक सलीम हवालदार, मनसेचे नितीन चव्हाण, संभाजी वाघमारे ,दिनेश नामदे, प्रकाश मोरे,संतोष कोळी, अनिल गिरी, विनायक थंबी आदी उपस्थित होते.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून सर्वच प्रभागांमध्ये सचोटीने व्यवसाय करून जगणाऱ्या पथारी, हातगाडी, स्टॉलधारकावरती अत्यंत चुकीच्या पद्धतीने कारवाई करण्यात येत असून एकीकडे हॉकर झोनची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी आम्ही महाराष्ट्र शासन, केंद्र शासन त्याचबरोबर न्यायालयीन लढाई ही लढत आहोत मात्र महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे हे जाणीवपूर्वक या कायद्याला बगल देऊन परस्पररित्या क्षेत्रीय अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन कारवाई करण्यासाठी आदेश देत आहेत हे चुकीचं असून अशा कारवाईस विरोध राहील .