ताज्या घडामोडीपिंपरी

“आपल्या मनातच ‘स्वर्णिम भारत’ ही संकल्पना रुजायला हवी!” – ब्रह्माकुमारी आकांक्षा

Spread the love

*वासंतिक व्याख्यानमाला – अंतिम पुष्प

पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – “आपल्या मनातच ‘स्वर्णिम भारत’ ही संकल्पना रुजायला हवी!” असे प्रतिपादन ब्रह्माकुमारी आकांक्षा यांनी  चिंचवडगाव येथे केले.

ज्येष्ठ नागरिक संघ, चिंचवड आयोजित तीन दिवसीय वासंतिक व्याख्यानमालेत ‘स्वर्णिम भारत’ या विषयावरील अंतिम पुष्प गुंफताना ब्रह्माकुमारी आकांक्षा बोलत होत्या. माजी नगरसेविका अश्विनी चिंचवडे, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष रमेश इनामदार, उपाध्यक्ष चंद्रकांत कोष्टी यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.

दीपप्रज्वलन, प्रतिमापूजन तसेच रत्नप्रभा खोत आणि मंगला दळवी यांनी केलेल्या त्रिवार ओंकाराने कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. अध्यक्ष रमेश इनामदार यांनी प्रास्ताविकातून संस्कृत कवी बाणभट्ट यांचा संदर्भ देत कोणत्याही गोष्टीकडे सकारात्मकपणे पाहिले पाहिजे; तसेच आत्मा ते परमात्मा हा प्रजापिता ब्रह्माकुमारी यांच्या तत्त्वज्ञानाचा प्रवास आहे, असे मत व्यक्त केले.
अश्विनी चिंचवडे यांनी, “ज्येष्ठ नागरिक संघ, चिंचवड ही संस्था वर्षभर विविध उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकी आणि संस्कृती संवर्धनाचे कार्य करते!” असे गौरवोद्गार काढले. व्याख्यानापूर्वी, या महिन्यात वाढदिवस असलेल्या सभासदांचा सत्कार करण्यात आला.

ब्रह्माकुमारी आकांक्षा पुढे म्हणाल्या की, “स्वातंत्र्यप्राप्तीनंतर अनेक स्थित्यंतरातून देश जात आहे. महासत्तेच्या दिशेने वाटचाल, देदीप्यमान वैज्ञानिक प्रगती एका बाजूला आणि समाजातील प्रचंड आर्थिक विषमता दुसर्‍या बाजूला हे चित्र अस्वस्थ करणारे आहे. पाच हजार वर्षांपूर्वीची देशातील समृद्धी खरोखरच ‘सोन्याचा धूर निघणारी भूमी’ या वर्णनाची सत्यता प्रतीत करणारी होती. पूर्वी सुख – दुःखात सर्व गाव एकत्र येत असे. सामाजिक एकोपा होता. मग आताच्या काळात संस्कृतीचे अध:पतन का व्हावे, असा प्रश्न मनात येतो. राजसत्ता, धर्मसत्ता आणि समाजसत्ता यांच्याकडून सुवर्णकाळाची अपेक्षा करण्यापूर्वी आपल्या स्वतःकडूनच याबाबत कृती केली तर? सुख, शांती, आनंद, समाधान या गोष्टी बाहेर शोधण्यापेक्षा आपल्याच अंतर्मनात शोधायला हव्यात. आपले दैनंदिन आचारविचार, व्यवहार शुद्ध असतील तर सुवर्णकाळ फार दूर नाही. व्यक्ती, कुटुंब, समाज, गाव आणि देश अशी आचरणशुचितेची व्याप्ती असेल तरच भेदभाव, विषमता, अनीती, अत्याचार, अनारोग्य आणि गरिबीमुक्त स्वर्णिम भारत जगात अग्रस्थानी विराजमान होईल!”

गोपाळ भसे, नारायण दिवेकर, सतीश कुलकर्णी, सुधाकर कुलकर्णी, सुदाम गुरव, चंद्रकांत पारखी, राजेंद्र भागवत, मोहन बेदरकर, उषा गर्भे, मंदाकिनी दीक्षित, सुनील चव्हाण यांनी संयोजनात सहकार्य केले. नंदकुमार मुरडे यांनी सूत्रसंचालन केले. शामकांत खटावकर यांनी आभार मानले. पसायदानाने व्याख्यानमालेची सांगता करण्यात आली.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button