पं. गिरीष संजगिरी यांचा कलाश्री पुरस्काराने, तर पं. मोहसीन खान यांचा ‘कलाश्री युवा पुरस्काराने सन्मान


रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात कलाश्री संगीत महोत्सवाची सांगता



पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – कलाश्री संगीत मंडळातर्फे देण्यात येणारा यंदाचा ‘कलाश्री पुरस्कार’ लोकनेते माजी आमदार स्व. लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या स्मरणार्थ पंडित गिरीष संजगिरी यांना उद्योजक विजय जगताप यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. पुणेरी पगडी, एक लाख ११ हजार एकशे अकरा रुपये, सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते. तसेच स्व. शंकुतला नारायण ढोरे यांच्या स्मरणार्थ ‘कलाश्री युवा पुरस्कार’ प्रसिद्ध सतार वादक पं. मोहसीन खान यांना जयवंत महाराज बोधले यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
नवी सांगवीतील नटसम्राट निळू फुले रंगमंदिर येथे २७ वा कलाश्री संगीत महोत्सव रसिकांच्या मोठ्या प्रतिसादात संपन्न झाला. यावेळी उद्योजक विजय जगताप, माजी शिवसेना शहर प्रमुख भगवान वाल्हेकर, अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा आरती राव, ह.भ.प. पंकज महाराज गावडे, ह.भ.प. जयवंत महाराज बोधले, आयोजक पंडित सुधाकर चव्हाण, आदित्य जगताप आदी उपस्थित होते.
दरम्यान, कलाश्री संगीत महोत्सवाची सांगता पं. समीर सुर्यवंशी व शिष्य यांचे वादन, गायिका शाश्वती चव्हाण यांचे बहारदार शास्त्रीय गायन आणि पं. रघुनंदन पणशीकर यांच्या सुश्राव्य गायनाने झाली.
तिसऱ्या दिवसाची सुरुवात समीर सुर्यवंशी व त्यांच्या शिष्यांनी तीन तालाने केली. त्यानंतर तिस्त्र जाती कायदा व झाला’चे सादरीकरण, अनिंदो चटर्जी यांची डग्गा व चाटी यांच्या मिश्रणातून तयार केलेला कायदा, लखनऊ घराण्याच्या काही बंदिशी, गत, कायदे, रेले, तुकडे यासह वादन करण्यात आले. चक्रधार कायद्याने त्यांच्या वादनाची अखेर झाली. त्यांना माधव मारणे यांनी हार्मोनियमची साथसंगत केली.

शास्त्रीय गायिका शाश्वती चव्हाण यांनी राग यमनमध्ये विलंबित झुमरा तालात ‘सजनी निस जात’ ही बंदिश सादर करीत रसिकांना खिळवून ठेवले. त्यानंतर तीन तालातील बंदिश ‘तू जग मे शरम रख मेरी’ गायली. किराणा घराण्याची विशेष अशी सरगम व ताना गाऊन रसिकांची उत्स्फूर्त दाद मिळवली. विष्णुमय जग हा अभंग गात त्यांनी आपल्या गायनाची सांगता केली. त्यांना हार्मोनियमवर गंगाधर शिंदे यांनी, तबल्यावर किशोर कोरडे यांनी, तर तानपुरा साथ सिद्धी ताजने व श्रावणी पोटले यांनी केली.
महोत्सवाची सांगता पं. रघुनंदन पणशीकर यांच्या गायनाने झाली. पणशीकर यांनी राग रागेश्री घेत विलंबित तीनतालमध्ये ‘पलक न लागी’ या बंदिशीचे रसिकांनी उत्स्फूर्त स्वागत केले. त्यानंतर एकतालमध्ये ‘देखो शाम ही’ बंदिश सादर केली. ‘अवघा रंग एक झाला’ या अभंगाने महोत्सवाची सांगता केली. त्यांना हार्मोनियमवर सुयोग कुंडलकर यांनी, तबल्यावर भरत कामत यांनी, तर तानपुरा व स्वरसाथ सौरभ काडगांवकर आणि राधिका जोशी यांनी केली.








