श्रमश्री बाजीराव सातपुते यांचा अभिष्टचिंतन सोहळा उत्साहात संपन्न


पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – “बाजीराव सातपुते हे मातेशी आणि मातीशी नाळ जुळलेले व्यक्तिमत्त्व आहे!” असे गौरवोद्गार ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी चऱ्होली येथे (शनिवार, दिनांक ११) व्यक्त केले.



नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीच्या वतीने पंतप्रधान श्रमश्री पुरस्कारप्राप्त बाजीराव सातपुते यांच्या सेवानिवृत्ती आणि एकसष्ठीनिमित्त आयोजित अभीष्टचिंतन सोहळ्यात डॉ. श्रीपाल सबनीस बोलत होते. ज्येष्ठ समाजसुधारक पद्मश्री गिरीश प्रभुणे, नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीचे अध्यक्ष सुदाम भोरे, एस. के. एफ. एम्प्लॉईज युनियन अध्यक्ष सुनील आव्हाळे, माजी सभापती सुभाष उमाप, श्रमश्री बाजीराव सातपुते यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.

डॉ. श्रीपाल सबनीस पुढे म्हणाले की, “पंतप्रधान श्रमश्री पुरस्कार स्वीकारण्यासाठी त्यांनी पत्नीऐवजी आईला सोबत दिल्ली येथे नेले. आईवडिलांकडून त्यांच्यावर श्रमसंस्कार झाले आहेत!” पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी, “विविध कर्तृत्ववान व्यक्तींच्या कार्याचा अभ्यास करून त्यांचे चरित्र आधी व्याख्यानातून आणि नंतर लेखनातून बाजीराव सातपुते यांनी जनमानसात पोहोचवले. आत्ता सेवानिवृत्ती झाली असली तरी त्यांची सामाजिक कार्याची वृत्ती असल्याने अनेक उपक्रम ते राबवतील!” अशी ग्वाही दिली. सुनील आव्हाळे यांनी, “बाजीराव सातपुते यांनी आयुष्यात नेहमी वेळेला आणि श्रमाला महत्त्व दिले!” अशी माहिती दिली. सुभाष उमाप यांनी सातपुते कुटुंबीयांसोबत असलेल्या दीर्घकाळ स्नेहबंधाच्या आठवणींना उजाळा दिला.
यावेळी सुवासिनींनी विधिवत औक्षण केले. नंतर मान्यवरांकडूनतुकोबांची पगडी, गाथा, सन्मानचिन्ह, मानपत्र, शाल प्रदान करून बाजीराव सातपुते यांना सन्मानित करण्यातआले.
सत्काराला उत्तर देताना त्यांनी, “एखाद्या कामगाराचा अभीष्टचिंतन सोहळा इतका हृद्य होऊ शकतो याचे नवल वाटले. ग्रामीण भागातून आलेला मी एक शेतकऱ्याचा मुलगा, पिंपरी – चिंचवडमध्ये शिकायचे पैसे मिळतात म्हणून उद्योगनगरीत आलो. भाजी विकण्यापासून अनेक कष्ट केले. यंत्रावर घाम गाळून लेखणीतून साहित्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला. या वाटचालीत पद्मभूषण अण्णा हजारे, पद्मश्री पोपटराव पवार, पद्मश्री नारायण सुर्वे, भाई वैद्य, प्र. चिं. शेजवलकर, नागनाथ कोत्तापल्ले अशा अनेक दिग्गजांचा सहवास लाभला. एसकेएफ माझी दुसरी आई आहे!” अशा भावना व्यक्त केल्या. सुदाम भोरे यांनी, “बाजीराव सातपुते यांनी, “छोट्या खेड्यातून येऊन कष्टसाध्य यश संपादन केले आहे; तसेच कौटुंबिक सौख्य जपत त्यांनी सामाजिक कार्याचा वसा जपला आहे!” अशी पुष्टी दिली. पुरुषोत्तम सदाफुले यांनी प्रास्ताविक केले. मनीषा सातपुते यांनी “हंबरून वासराले चाटते जवा गाय…” या कवितेचे अभिवाचन केले.
त्यापूर्वी, ‘एक झाड आईसाठी | एक झाड राष्ट्रासाठी ||’ उपक्रमांतर्गत सातपुते यांच्या आई – वडिलांच्या हस्ते सकाळी दहा वाजता वृक्षारोपण करण्यात आले. दुपारी बारा वाजता तळवडे येथील इंद्रायणी वृद्धाश्रमातील माता – पित्यांसमवेत स्नेहभोजन करण्यात आले. दुपारी पाच वाजता अभीष्टचिंतन सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते मधुमेहमुक्त भारत अभियानाचे पाईक डॉ. राजेंद्र माने, सेंद्रिय खते व वनस्पतीजन्य औषध निर्मितीसाठी संशोधन करून डॉक्टरेट प्राप्त करणारे डॉ. संभाजी सातपुते आणि अभिजात पाली भाषेचे प्रसारक अन् प्रचारक महेंद्र भारती यांचा विशेष सन्मान करण्यात आला. साहेबराव सातपुते, अरुण गराडे, नितीन हिरवे, प्रदीप गांधलीकर यांनी संयोजनात सहकार्य केले. सीमा गांधी यांनी सूत्रसंचालन केले. मनाली सातपुते यांनी आभार मानले.








