उद्योजकांना त्रास देणाऱ्यांची गय करू नका! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पोलीस आयुक्तांना थेट ‘फ्री हॅन्ड’


पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्योगाबाबत पोलिस अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत. उद्योगाबाबत कुठल्याही व्यक्तीला त्रास होऊ नये. अशा सक्त सूचना देवेंद्र फडणवीस यांनी केल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या इमारतीच्या भूमिपूजना प्रसंगी बोलत होते. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार आमदार महेश लांडगे, पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्यासह इतर पोलीस अधिकारी उपस्थित होते.



देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, पिंपरी चिंचवड शहराचे विस्तारीकरण गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात झाले. औद्योगीकरण वाढले अनेक क्लस्टर तयार झाले. या ठिकाणी गुंतवणूक देखील मोठ्या प्रमाणात वाढत आहे.हे सर्व होत असताना स्वतंत्र आयुक्तालयाची गरज निर्माण झाली. वेळोवेळी त्याबाबत मागणी होत गेली. ही मागणी आता पूर्णत्वाला जाणार आहे. 2025 मध्ये पिंपरी चिंचवड शहराचे नवीन आयुक्तालय स्वतंत्र इमारतीमध्ये स्थलांतरित होईल. सुसज्ज, अत्याधुनिक आणि खाजगी गृहनिर्माण धोरणालाही लाजवेल असे अद्यावत सरकारी कार्यालय निर्माण होणार आहे. अत्यंत निकडीची गरज म्हणून आयुक्तालयाची निर्मिती ती देखील सीएसआर फंडाच्या माध्यमातून हे कौतुकास्पद आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, पुणे जिल्हा हा टेक्नॉलॉजीच कॅपिटल आहे. या जिल्ह्यात अनेक गुंतवणूक येत आहेत. या गुंतवणुकीला जिल्ह्यामध्ये पोषक वातावरण तयार करायला हवं. हे पोषक वातावरण पोलीस अधिकारी तयार करतील अशी अपेक्षा देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. उद्योजकांना कुठलाही त्रास होऊ नये. कुठलाही नेता असू द्या त्याला क्षमा (गय) केली जाणार नाही. असा इशारा देखील देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. अनेक उद्योजकांच्या पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयात तक्रारी आल्या होत्या, त्यांना त्रास होत असल्याचं त्यांनी या तक्रारीत म्हटलं होतं. या विषयावरूनच देवेंद्र फडणवीस यांनी व्यासपीठावरूनच पोलीस अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.








