ताज्या घडामोडीपिंपरी
विविध सामाजिक माध्यमे ही रंगबिरंगी गॉगल तर पत्रकारिता हा वास्तविकतेचा चष्मा- सरिता कौशिक


पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – आज व्हाट्सअप ची बाधा ही पत्रकारिते समोर एक समस्या बनली आहे. व्हाट्सअप वर आलेला प्रत्येक मेसेज प्रत्येक माहिती ही बातमी नसून ती पडताळून पाहणे गरजेचे ठरते कित्येकदा यातून समाजात चुकीचा संदेश जातो त्यामुळे व्हाट्सअप वर आलेला मजकूर हा अनेकदा पत्रकारितेत बाधा उत्पन्न करतो. काही एक दोन उदाहरणांमुळे पत्रकारांबद्दलचा समाजात आदर कमी होत नाही आजही मोठ्या प्रमाणामध्ये समाजाचा खरा आरसा हा पत्रकारच आहे. आजच्या विविध सोशल मीडियारूपी धुक्यामुळे पत्रकारांना वेगवेगळ्या गॉगल मधून पाहण्याचे काम समाज करतो मात्र आज पत्रकारांना निरपेक्ष वास्तववादी चष्म्यातून पाहणे गरजेचे आहे, असे मत संपादिका सरिता कौशिक यांनी निगडी येथे व्यक्त केले.
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई, पिंपरी चिंचवड शहर , पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती यांच्या वतीने आचार्य बाळशास्त्री जांभेकर – पत्रकार भूषण”पुरस्कार सोहळा २०२५ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्या वेळी त्या बोलत होत्या . सोमवार, दि. ६ जानेवारी २०२५ रोजी सकाळी १०.०० वा ग. दि. माडगूळकर सभागृह, निगडी येथे हा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमांमध्ये महाराष्ट्र (माध्यमांची) दशा आणि दिशा हा परिसंवादाचा कार्यक्रम घेण्यात आला.
यावेळी सरिता कौशिक संपादिका , अभिनेता किरण माने, पद्मश्री गिरीश प्रभुणे, आमदार अमित गोरखे, सचिन जवळकोटे, उद्योजक संजय कलाटे, यशवंत भोसले, वसंत मुंडे प्रदेशाध्यक्ष, विश्वासराव आरोटे सरचिटणीस, संजय भोकरे संघटक, इरफान भाई सय्यद शिवसेना उपनेते, वैभव विधाटे, नितीन शिंदे प्रदेश उपाध्यक्ष , अतुल क्षीरसागर शहराध्यक्ष, पराग कुंकूलोळ माजी शहराध्यक्ष, गोविंद वाकडे प्रदेशाध्यक्ष पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती,मनीषा थोरात महिला शहर अध्यक्षा
पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती , सचिन चपळगावकर, व पत्रकार संघ सदस्य उपस्थित होते.
कार्यक्रमाचे उद्घाटन करताना भोसरी विधानसभेचे माजी आमदार विलास लांडे म्हणाले की पत्रकार हा सामाजिक व्यवस्थेचा आधारस्तंभ आहे त्याचबरोबर स्वातंत्र्यपूर्व काळापासून ते आजपर्यंत पत्रकारिता व सामाजिक कार्य हे एकमेकास पूरक आहे पिंपरी चिंचवड शहर हे मोठे शहर असून येथे सर्व जाती धर्माचे लोक येथे राहतात . शहराच्या वेगवेगळ्या समस्या असल्या तरी त्या योग्य रीतीने समोर आणण्याचे काम शहरातील सर्व माध्यमाचे पत्रकार करत आहेत पत्रकारांची लेखणी ही समाज बदलाचे साधन मानायला हवे. समाजाची दशा पाहून योग्य दिशा देण्याची जबाबदारी पत्रकारांवर अवलंबून असते.
परिसंवादा दरम्यान संवादक किरण माने यांनी पत्रकारितेत येणाऱ्या अडचणी , दडपण व जबाबदारी यावर आधारित विविध विषयांवर चर्चा केली.
पद्मश्री गिरीश प्रभुणे म्हणाले ,पत्रकारितेत जूना व नवा काळ असा नसून पत्रकारिता हे कायम वर्तमान कालीन असते त्यामुळे त्या काळातील स्वातंत्र्यपूर्व काळात परखड लिखाण करताना अनेक पत्रकारांना जेलवारी करावी लागली मात्र तरीही ते न डगमस्थान आपल्या विचारांवर कायम राहिले व स्वातंत्र्यामध्ये मोठी योगदान दिले आजही अनिष्ट रिती, समस्या यांना वाचा फोडण्याची जबाबदारी ही पत्रकारांवरच आहे.
चर्चेस उत्तर देताना सरिता कौशिक म्हणाल्या की,जात, धर्म, पंथ सोडून पत्रकार हा समाजातील दशा व दिशा ही मांडत असतो. त्यामुळे समाजाला योग्य रीतीने पुढे नेण्याची जबाबदारी हा आजचा पत्रकार योग्य पद्धतीने करत आहे आज समाजातील विविध चळवळ उभ्या राहत असताना पत्रकारांचा मोठा वाटा यात असतोच. पत्रकार हा लोकांना काय हवे आहे यापेक्षा समाजात काय घडत आहे हे नि:पक्षपातीपणे भावनेने दाखवतो त्यामुळेही कदाचित काही लोकांना ते पटत नाही .
कार्यक्रमादरम्यान आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार भूषण २०२५ पुरस्काराने महाराष्ट्र राज्यातील पत्रकारांना सन्मानित करण्यात आले. यामध्ये ग्रामीण, दुर्गम भागातील तसेच शहरातील अशा वेगवेगळ्या सामाजिक प्रश्नांना वाचा फोडणाऱ्या पत्रकारांचा समावेश होता.
मान्यवरांचे स्वागत नितीन शिंदे यांनी केले तर सूत्रसंचालन अश्विनी सातव यांनी केले व आभार अतुल क्षीरसागर यांनी मानले.








