ताज्या घडामोडीपिंपरीमहाराष्ट्र

महाविकास आघाडीतील सर्व इच्छुकांनी मुंबईत घेतली धाव

Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होऊनही पिंपरी-चिंचवडमधील तिन्ही मतदारसंघांतील महाविकास आघाडीचा अद्याप एकही उमेदवार ठरला नाही. त्यामुळे अस्वस्थ झालेल्या शहरातील संभाव्य इच्छुकांनी मुंबईला धाव घेतली आहे. महायुतीमधील भाजपने चिंचवडमधून शंकर जगताप आणि भोसरीतून विद्यमान आमदार महेश लांडगे यांची उमेदवारी जाहीर केली. तर, पिंपरीचे राष्ट्रवादी (अजित पवार) आमदार अण्णा बनसोडे यांना पक्षातून विरोध वाढला आहे. महायुतीने दोन उमेदवार जाहीर केले असताना महाविकास आघाडीत कोणता मतदारसंघ कोणत्या पक्षाकडे राहणार हे चित्रही स्पष्ट झाले नाही. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाने तिन्ही मतदारसंघांवर दावा केला आहे. तर, शिवसेना (ठाकरे) पक्षाचा पिंपरी आणि भोसरीवर दावा आहे.

महाविकास आघाडीतील सर्व इच्छुकांनी मुंबईत धाव घेतली. पिंपरीतून विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असलेल्या राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाच्या माजी नगरसेविका सुलक्षणा शिलवंत, भाजपच्या माजी नगरसेविका सीमा सावळे, शिवसेना (ठाकरे) पक्षाचे शहरप्रमुख सचिन भोसले, चिंचवडमधील माजी नगरसेवक राहुल कलाटे, नाना काटे, चंद्रकांत नखाते हे मुंबईत ठाण मांडून आहेत. त्यापैकी कलाटे, काटे आणि नखाते यांची शरद पवार यांनी एकत्रित बैठक घेतली. तुम्ही जो उमेदवार द्याल, त्याचे काम करण्याची ग्वाही तिघांनी दिली. कलाटे हे राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षात प्रवेश करण्याची शक्यता आहे. विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षातून राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षात आलेले अजित गव्हाणे, भाजपमधून शिवसेनेत (ठाकरे) आलेले रवी लांडगे हे सर्व इच्छुक मुंबईत ठाण मांडून आहेत. शिवसेना (ठाकरे) पक्षाची तिन्ही पैकी एक मतदारसंघ मिळावा अशी आग्रही भूमिका आहे. त्यामुळे पिंपरी मतदारसंघ शिवसेनेला (ठाकरे) देण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. पण, उमेदवार राष्ट्रवादी (शरद पवार) या पक्षातील असेल असे सांगण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button