गंगोत्री पार्क येथील रस्त्याच्या कामाला ‘ग्रीन सिग्नल’
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – महानगरपालिका प्रभाग क्रमांक 5 मध्ये गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित गंगोत्री पार्क येथील रस्त्याच्या कामाला अखेर सुरूवात झाली. महानगरपालिका स्थापत्य विभागाकडून तात्काळ दुरूस्तीचे काम हाती घेतले आहे. भाजपा आमदार महेश लांडगे यांच्या सूचनेनंतर या कामाला गती मिळाली असून, वाहनचालक व स्थानिक नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
भोसरी-दिघी रस्ता गंगोत्री पार्क या सोसायटीच्या कॉर्नरपर्यंत सुमारे १८ मीटरचा आहे. सदर रस्ता पुढे बंद आहे. २००५ ते २०१० दरम्यान रस्त्याच्या बाजुला प्लॉटिंग करुन विकले आणि काही ठिकाणी गृहप्रकल्प बांधून विकण्यात आला. सोसायटी उभारण्यात आल्या. त्यामुळे रस्ता ‘बॉटलनेक’ झाला आहे. भोसरीतून दिघीला जाणारा जवळचा रस्ता असल्यामुळे या रस्त्यावर मोठ्याप्रमाणात वाहतूक असते. मात्र, रस्त्याची दुरावस्था झाल्यामुळे नागरिकांत मोठी नाराजी होती.
दरम्यान, आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक सामाजिक कार्यकर्ते सागर गवळी आणि सौ. कविता भोंगाळे यांनी याकामी पुढाकार घेतला. महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे-पाटील यांनी दोन-तीन दिवसांत काम सुरू करतो, असे आश्वासन दिले होते. त्यांनी दिलेला ‘शब्द’ पूर्ण केला आहे. स्थापत्य विभागाच्या माध्यमातून सदर रस्त्याचे काम सुरू झाले आहे.
विरोधी उमेदवारांकडून नागरिकांची दिशाभूल…
वास्तविक, प्रभाग ५ अंतर्गत येणाऱ्या गंगोत्री पार्क रस्त्याचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. या प्रभागात सुमारे २० वर्षे प्रतिनिधीत्व करणाऱ्या माजी नगरसेवकांनी रस्त्यांचा गुंता सोडवला नाही. आता सदर प्रश्न सुटणार आणि आम्ही सोडवला असा दावा करीत पाणी पुरवठा अधिकाऱ्यांचा पाहणी दौरा करण्यात आला. त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले. पण, सदर काम स्थापत्य विभागाकडून करण्यात येत आहे. निवडणुकीच्या तोंडावर राजकीय नेत्यांनी सोशल मीडियावर पब्लिसिटी करण्यापेक्षा आपल्या सत्ताकाळात आपण केले? काय करणार आहोत? याबाबत लोकांना माहिती द्यावी. नागरिकांना सुविधा मिळाव्यात. यासाठी लोकप्रतिनिधींनी काम केले पाहिजे. नागरी समस्यांबाबत राजकारण न करता समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे, अशी भावना स्थानिक नागरिकांकडून व्यक्त होत आहे.