मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत महापालिकेच्या वतीने रोजगार मेळाव्याचे आयोजन
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांची नोकरी मिळण्याची क्षमता वाढविण्यासाठी “मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना” महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आयुक्त शेखर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली २६ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० ते सायंकाळी ०५.०० या वेळेत दिव्यांग भवन फाऊंडेशन मोरवाडी, पिंपरी -१८ या ठिकाणी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने विविध विभागप्रमुखांमार्फत मोरवाडी येथील दिव्यांग भवन व परिसराची पाहणी करण्यात आली.
या पाहणीदरम्यान मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण, सहशहर अभियंता ज्ञानदेव जुंधारे, समाजविकास विभागाचे सहाय्यक आयुक्त तानाजी नरळे, श्रीनिवास दांगट, माहिती व तंत्रज्ञान अधिकारी अनिता कोटलवार, सुधीर बोराडे, कार्यकारी अभियंता नितीन देशमुख, चंद्रकांत कोल्हे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, उपअभियंता बाळासाहेब शेटे, राजीव बटुळे, कनिष्ठ अभियंता प्रताप मोरे, गिरीश गुठे, दिपाली काळे तसेच विविध विभागातील कर्मचारी उपस्थित होते.
महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि मुख्यमंत्री जन-कल्याण कक्ष यांच्यामार्फत संयुक्तपणे “मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना” राबविली जाणार आहे. या उपक्रमांतर्गत https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळाच्या माध्यमातून रोजगार देणाऱ्या स्वयंसेवी संस्था, औद्योगिक आस्थापना, उद्योग समुह थेट लाभार्थ्यांशी जोडल्या जाणार असून बारावी, आय.टी.आय, पदविका, पदवी व पदव्युत्तर शैक्षणिक पात्रता धारण केलेले रोजगार इच्छुक उमेदवार या संकेतस्थळावर ऑनलाईन व ऑफलाईन पध्दतीने नोंदणी करू शकतात.
पदांचा तपशिल आणि अर्ज करण्याची प्रक्रिया
महापालिकेच्या वतीने फिल्ड सर्वे इन्युमरेटर, माळी, मल्टी टास्कींग स्टाफ, स्थापत्य अभियंता, डेटा एन्ट्री ऑपरेटर, आरोग्य निरीक्षक, वायरमन, विद्युत अभियंता, डी.टी.पी. ऑपरेटर, लिपिक, शिपाई अशा विविध पदांच्या एकूण ५७५ उमेदवारांना ६ महिन्यांच्या प्रशिक्षण कालावधीसाठी नियुक्त करण्यात येणार आहे. या उमेदवारांना त्यांच्या शैक्षणिक अर्हतेनुसार तसेच शासनाने ठरवून दिलेल्या दरानुसार विद्यावेतन देण्यात येणार आहे. तसेच शासनामार्फत या कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत विद्यावेतनाची रक्कम डीबीद्वारे प्रशिक्षणार्थींच्या थेट बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे. संबंधित उमेदवारास महानगरपालिकेच्या कोणत्याही संवर्गात सेवा समावेशनाबाबत किंवा सामावून घेण्याबाबत व नियमित सेवेचा इतर कोणताही लाभ मिळण्याचा अधिकार नसेल.
इच्छुक उमेदवारांनी कौशल्य, रोजगार व उद्योजकता विभागाच्या https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करून रोजगार नोंदणी क्रमांक प्राप्त करणे तसेच पोर्टलवरील पदांसाठी ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. यासोबतच इच्छुक उमेदवारांनी https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नाव नोंदणी करून महापालिकेच्या विभागवार प्रशिक्षणास इच्छुक असल्याची नोंद करणेही गरजेचे आहे.
योजनेकरिता पात्रता निकष :-
• उमेदवाराचे किमान वय १८ वर्षे ते कमाल वय ३५ वर्षे असावे.
• उमेदवाराची शैक्षणिक पात्रता १२ वी उत्तीर्ण / आय.टी.आय. उत्तीर्ण / पदविका उत्तीर्ण / पदव्युत्तर उत्तीर्ण / पदवी उत्तीर्ण असावी. मात्र शिक्षण घेत असलेले उमेदवार या योजनेत सहभागास पात्र असणार नाहीत.
• उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
• उमेदवाराची आधार नोंदणी आवश्यक असून बँक खाते आधार संलग्न असावे.
• या योजनेअंतर्गत प्रशिक्षण घेत असताना आपणांस कोणतेही किमान वेतन कायदा, राज्य कामगार विमा कायदा, कामगार भविष्य निर्वाह निधी कायदा, कामगार नुकसान भरपाई कायदा व औद्योगिक विवाद कायदा लागू राहणार नाही.
कोट – जास्तीत जास्त उमेदवारांनी रोजगार मेळाव्यास उपस्थित राहून योजनेचा लाभ घ्यावा*
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेची माहिती देणे, संकेतस्थळावर नोंदणी व पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या २३ विभागांमध्ये ५७५ प्रशिक्षणार्थींच्या जागा भरण्यासाठी जिल्हा प्रशासन, महाराष्ट्र शासन कौशल्य व रोजगार विभाग व पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांनी २६ ऑगस्ट २०२४ रोजी दिव्यांग भवन फाऊंडेशन मोरवाडी, पिंपरी-१८ एकत्रितपणे आयोजित केलेल्या रोजगार मेळाव्याचा लाभ घेण्यासाठी मूळ कागदपत्रे व त्यांच्या छायांकित प्रतीसह (झेरॉक्स) मोठ्या संख्येने उपस्थित रहावे. तसेच अधिक माहितीसाठी शासनाच्या वतीने देण्यात आलेल्या अधिकृत संकेतस्थळांना भेट द्यावी, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी केले आहे.