ताज्या घडामोडीपिंपरी

कलाकृती कलाकारापेक्षा दीर्घायुषी असते- वासुदेव कामत

Spread the love

 

‘एमआयटी एडीटीत’र्फे ‘विश्वारंभ कला पुरस्कारा’चे वितरण

पुणे,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – चित्रकार कलेच्या माध्यमातूनच आपले विचार मांडण्याचा प्रयत्न करत असतो. कलाकार कलाकृती साकारत असतो तोपर्यंतच ती त्याच्या मालकीची असते. एकदा का त्याने तिच्यावर सही केली ती सार्वजनिक होते. इतिहासात कायमच योगदानाची नोंद राहते व्यवहाराची नाही. कारण, कलाकृती ही कलाकारापेक्षा जास्त आयुष्य घेऊन जन्मते, त्यामुळे कलाकाराने केवळ व्यवहारावर भर न देता योगदानावर भर द्यावा व अखेरीस शांती व तृप्ती रसाचा आनंद घ्यावा, असे प्रतिपादन प्रसिद्ध चित्रकार वासुदेव कामत यांनी केले.
ते एमआयटी आर्ट, डिजाईन व टेक्नाॅलाॅजी विद्यापीठ, पुणेच्या ललित कला, परफॉर्मिंग आर्ट्स, मीडिया, डिझाइन आणि आर्किटेक्चरचा सर्वांत मोठा महोत्सव असणाऱ्या “कारी-२०२४” निमित्ताने राजा रविवर्मा आर्ट गॅलरी येथे आयोजित ‘विश्वारंभ कला पुरस्कार’ स्विकारल्यानंतर बोलत होते. याप्रसंगी, प्रसिद्ध दिग्दर्शक जब्बार पटेल, माईर्स एमआयटी शिक्षण समुहाच्या कार्यकारी संचालक सौ.ज्योती ढाकणे, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे प्र.कुलगुरू डाॅ.अनंत चक्रदेव, डाॅ.मिलिंद ढोबळे, डाॅ.आनंद बेल्हे, डाॅ.अश्विनी पेठे आदी उपस्थित होते.    कामत यांनी आपल्या अमोघ वाणीतून रसिकांना मंत्रमुग्ध केले. यावेळी ते पुढे म्हणाले, आपल्या क्षेत्रामध्ये प्रत्येक जण मी अप्लाईड आणि फाईन आर्टिस्ट आहे, असे सांगतो. परंतू माझ्या मते आपले कलाकार असणे आणि त्यापेक्षाही आपल्यातील कला’कारी’ अधिक महत्त्वाची असते. कला ही मनुष्याच्या अंतापर्यंत साथ देते, आणि ज्याला कलेची आवड आहे, त्यालाच मनुष्य म्हटले जाऊ शकते. प्रा.डाॅ.चक्रदेव यावेळी म्हणाले, ‘कारि’ म्हणजे, काहीतरी नाविण्यपूर्ण घडविणे. ज्यामध्ये कविता, कलाकृती, चित्र, फोटो, तंत्रज्ञान, चित्रपट अशा प्रत्येक गोष्टीचा अंतर्भाव होऊ शकतो. एमआयटी एडीटी विद्यापीठाचा कॅम्पस मुळात अनेक कलाकृतींचा संगम असून जेथून अनेक कलाकार घडत आहेत.
विश्वशांती प्रार्थनेने सुरू झालेल्या या कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली, ज्याचे सुत्रसंचालन स्नेहा वाघटकर यांनी केले.

*कोट*
बंद आखोंसे देखे गये सपनों को जो साकार करें वो कलाकार होता है!, अगदी तशाच प्रकारे ‘विश्वारंभ’, या नावातच काहीतरी नाविन्यपूर्ण तयार करण्याची संकल्पना जडलेली आहे. अर्थातच या नावामागे आणि या पुरस्कारामागे आमचे मार्गदर्शक प्रा.डाॅ.विश्वनाथ दा.कराड यांची प्रेरणा आहे. प्रा.डाॅ.कराड हेही एक सुंदर कलाकार आहेत. जगातील सर्वांत मोठा विश्वशांती घुमट आणि विश्वराजबागेची बांधनी या त्यांच्याच दृष्टीतून साकारल्या गेलेल्या अप्रतिम कलाकृती आहेत. त्यामुळे आज श्री.वासुदेव कामत यांना ‘कारि’ प्रसंगी ‘विश्वारंभ कला पुरस्कार’ प्रदान करताना अतिशय आनंद होत आहे.
– *सौ.ज्योती ढाकणे – कराड*
कार्यकारी संचालक,
माईर्स एमआयटी शिक्षण समुह

*चौकट*
*_कलाकृती भविष्याशी संवाद साधतात – पटेल_*
_आपल्या अध्यक्षीय भाषणात प्रसिद्ध दिग्दर्शक जब्बार पटेल यांंनी अनेक गोष्टींवर प्रकाश टाकला. ते म्हणाले, जेव्हा मी कुठल्याही कलाकाराला विचारतो तेव्हा तो काहीतरी नवीन साकारतोय असे म्हणतो. परंतू जगात नवीन असे काहीच नाही. कारण एक कलाकार सर्वच गोष्टी आपल्या भवतालच्या गोष्टींना पाहून साकारत असतो. त्यात तो जी काही कलाकारी साकारतो ती इतिहासाचा अविभाज्य भाग होऊन जाते. त्यामुळे, कलाकारांच्या कलाकृती भविष्यातील पिढीशी संवाद साधण्याचे काम करता. त्यामुळे, कलाकाराचा हात नाजूक असला तरी त्याची कलाकृती मात्र कणखर हवी, असेही पटेल यांनी म्हटले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button