उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घेतले माऊलींचे दर्शन
आळंदी ( महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – उत्तरप्रदेश मध्ये शिवाजी महाराज यांचे लष्कर सामर्थ्यावर भव्य संग्रहालय निर्माण कार्य होत असल्याचे उत्तर प्रदेश चे मुख्यमंत्री योगी आदित्य नाथजी यांनी येथे सांगितले. आळंदी येथे प पू. गोविंददेव गिरी महाराज यांच्या ७५ व्या वाढदिवसा निमित्त गीताभक्ती अमृत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने रविवारी ( दि.११ ) उत्तर प्रदेश चे मुख्यमंत्री योगी आदित्य नाथ यांचे आळंदी मध्ये आगमन झाले होते. त्यांनी प्रथम संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी चे दर्शन घेतले.व पूजन केले.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथजी यांनी सिद्धेश्वर मंदिरात सिद्धेश्वराचे दर्शन घेतले. तत्पूर्वी माऊलींचे दर्शन घेतले. यावेळी आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त राजेंद्र उमाप, विश्वस्त योगी निरंजनाथ ,विश्वस्त विकास ढगे पाटील, देवस्थान व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर यांच्या हस्ते भगवे वस्त्र,संत ज्ञानेश्वर महाराज यांची मूर्ती व प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी देवस्थान कर्मचारी, भाविक उपस्थित होते.
श्री योगी आदित्यनाथजी महाराज यांच्या उपस्थितीने गीताभक्ती अमृत महोत्सवात आनंदोत्सव
आनंदी उत्साही वातावरण जय श्री राम चा नारा ; जल्लोष गीता परिवार आयोजित परमपूज्य स्वामी श्री गोविन्ददेव गिरीजी महाराज यांच्या ७५ व्या वाढदिवसा निमित्त गीताभक्ती अमृत महोत्सवाची सांगता आळंदीत भक्ती आणि सांस्कृतिक ऐश्वर्याच्या भव्य उत्सवात झाली.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री श्री योगी आदित्यनाथजी महाराज, योगऋषी श्री रामदेवजी महाराज आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची उपस्थिती समारोपाच्या दिवसाचे आकर्षण ठरली. महोत्सवात आठव्या दिनी आनंदोत्सव साजरा झाला. सुमारे १५ हजार हून अधिक भाविक यावेळी उपस्थित होते. आनंदाने अध्यात्मिक आणि सांस्कृतिक उत्सवात समरस होण्यास आले होते. उत्साहात संपूर्ण आळंदीची संत लीला भूमी भक्ती आणि शक्तीने, आनंदाने उजळून निघाली. महोत्सवाला सामूहिक अध्यात्माच्या तेजस्वी उत्सव साजरा केला.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आपले विचार मांडताना म्हणाले, “हा भव्य कार्यक्रम आयोजित केल्या बद्दल आणि अनेक दैवी व्यक्तिमत्त्वांना एकत्र आणल्याबद्दल मी स्वामी श्री गोविन्ददेव गिरीजी महाराज आणि गीता परिवार यांचा आभारी आहे. इथे येणे आणि संतांचे आशीर्वाद मिळणे हे माझे भाग्यच आहे. स्वामीजी अनेक वर्षांपासून गीतेच्या शिकवणीचा सक्रियपणे प्रचार करत आहेत आणि गीतेतील ज्ञान सर्वांसमोर सोप्या पद्धतीने मांडल्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करतो.”
संपूर्ण महोत्सवामध्ये, प्राचीन ज्ञानाचे पुनरुज्जीवन आणि प्रसार करण्याच्या उद्देशाने असंख्य उपक्रम राबवलेले गेले ज्यात श्रीमद्भागवत कथा, ज्ञानेश्वरोपासना, २५०० वैदिक आचार्यांनी केलेले ८१ हवन कुंडीय महायज्ञ, वेदशास्त्र संवाद, कृतज्ञता ग्यापन पर्व, नगर प्रदक्षिणा, रामायण आणि भारतीय संत परंपरा यांवर ४५० कलाकारांनी सादर केलेले महानाट्य, भक्तिरस गायन, कीर्तन, १,१११ विद्यार्थ्यांद्वारे मृदंग वादन, ११,१११ लोकांचे गीता पठण, ज्यात विद्यार्थी, गीता परिवारचे सदस्य आणि इतर भक्तांचा समावेश होता.
आळंदीच्या पवित्र भूमीवर हा पूजनीय कार्यक्रम :- मुख्यमंत्री योगी आदित्यनाथजी
यावेळी मुख्यमंत्री श्री योगी आदित्यनाथजी महाराज महोत्सवा विषयी म्हणाले, “आळंदीच्या पवित्र भूमीवर हा पूजनीय कार्यक्रम पूर्ण भव्यतेने आणि दिव्यतेने आयोजित करण्यात आला आहे. स्वामीजींनी गेली ७५ वर्षे वैदिक सनातन धर्मासाठी चिकाटीने आणि समर्पित प्रयत्न केले आहेत. हा महोत्सव पूज्य स्वामी श्री गोविन्ददेव गिरीजी महाराज यांनी हाती घेतलेल्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची एक संधी आहे.”
अध्यात्मिक गुरु आचार्य श्री बाळकृष्णजी महाराज, स्वामी श्री राजेंद्रदासजी महाराज, श्री अवधेशानंद गिरीजी महाराज, शंकराचार्य श्री विजयेंद्र सरस्वतीजी महाराज, श्री रमेशभाई ओझा, साध्वी भगवती सरस्वतीजी, स्वामी चिदानंद मुनीजी महाराज तसेच श्री चंद्रकांतदादाजी पाटील, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री, महा. राज्य दिलीपरावजी वळसे पाटील, सहकार मंत्री, महाराष्ट्र राज्य चंद्रकांत पाटील आदींचे मनोगते झाली.
गीताभक्ती अमृत महोत्सवाच्या समारोपाच्या वेळी, स्वामी श्री गोविन्ददेव गिरीजी महाराज यांनी कृतज्ञता व्यक्त करताना म्हटले, “मी सर्व संतांचे आणि आदरणीय पाहुण्यांचे त्यांच्या बहुमोल उपस्थितीबद्दल हार्दिक स्वागत आणि मनःपूर्वक आभार मानतो, या पवित्र महोत्सवाला सर्वांच्या उपस्थितीने खरोखर समृद्ध आणि प्रकाशित केले आहे.”