कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात नैसर्गिक मानवी मेंदूचे महत्त्व विसरता कामा नये – डॉ. आदित्य अभ्यंकर


चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) -चिंचवड येथील कमला एज्युकेशन सोसायटी संचालित प्रतिभा कॉलेज ऑफ कॉमर्स अँड कॉम्प्युटर स्टडीज च्या वतीने महाविद्यालयात शास्त्रज्ञ सी .व्ही . रामन यांच्या राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून विद्यार्थी व प्राध्यापकासाठी संस्थेचे सचिव डॉ दीपक शहा यांच्या मार्गदर्शनाखाली कृत्रिम बुद्धिमत्ता, त्याची साधने व उपयुक्तता या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्याचे उद्घाटन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील तंत्रज्ञान विभागाचे डीन व अभ्यासक वक्ते डॉ. आदित्य अभ्यंकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुणकुमार वाळुंज होते. त्यांच्या समवेत व्यासपीठावर यावेळी उपप्राचार्या डॉ. क्षितिजा गांधी, विभाग प्रमुख डॉ. जयश्री मुळे, डॉ. राजश्री ननावरे, प्रा. जयश्री कांबळे उपस्थित होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुणकुमार वाळुंज यांच्या हस्ते प्रमुख वक्ते डॉ. आदित्य अभ्यंकर यांच्या शाल व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
प्राध्यापक व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. आदित्य अभ्यंकर म्हणाले, कृत्रिम बुद्धिमत्ता ( एनआय ) रोबोट्स कसे काम करते. त्याचा वापर कसा करता येईल, या बाबतीत माहीती देताना म्हणाले आपल्याला हे नवीन तंत्रज्ञान आत्मसात करणे काळाची गरज आहे .त्याचे प्रमुख कारण जगभरात नवनवीन तंत्रज्ञान विकसित होत आहे. ते आपण शिकून आत्मसात केले नाही तर , भविष्यात दिवसें गणित आपल्याला अवघड होत जाईल .यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता ( एनआय ) रोबोट्स, त्याची साधने व त्याची उपयुक्तता याबाबतीत सखोल ज्ञान प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी घेतलेच पाहिजे . ही काळाचीच देखील गरज आहे. आज कृत्रिम बुद्धिमत्ता रोबोट्स वापरताना आपल्याकडील नैसर्गिक बुद्धिमत्ता मानवी मेंदूचा वापर कमी होत चाललेला आहे .हा एक धोका देखील आहे . तसेच भविष्यात जर ही सर्व यंत्रे , नवीन तंत्रज्ञान मानवी नियंत्रणाच्या ताब्याबाहेर गेली तर , त्यावर नियंत्रण मिळविणे देखील अवघड होईल. मग धोकादायक परिस्थिती निर्माण होईल. यासाठी नव्या युगात कार्यरत असताना आपली नैसर्गिक बुद्धिमत्ता मानवी मेंदू घासून पुसून जागरूकपणे स्वच्छ ठेवण्याची देखील आवश्यकता आहे .आपणास आवडो किंवा न आवडो हे वास्तव देखील आहे . असे सांगून डॉ. अभ्यंकर पुढे म्हणाले, वैज्ञानिक जगासमोर आपली मते मांडताना म्हणतात, संशोधनासारखे पवित्र व शुद्ध दुसरे काहीच नाही त्यातूनच ज्ञान प्राप्ती मिळू शकते. संशोधक आणि जे महान वैज्ञानिक होऊन गेले त्यांनी कशा प्रकारे काम केले , याची माहिती नवीन पिढीला मिळते. राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून कृत्रीम बुध्दी मत्ता कार्यशाळेचे आयोजन केले त्याबद्दल समाधान व्यक्त करून प्राध्यापक व विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना समर्पकपणे उत्तरे देत, त्यांच्या शंकाचे निरसन यावेळी करण्यात आले.


कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्राचार्य डॉ. अरुणकुमार वाळुंज यावेळी म्हणाले, प्राध्यापक आपल्या अभ्यासक्रमाचे अध्ययन करून विद्यार्थ्यांना सखोल शिकवितात हे त्यांचे कामच आहे. तंत्रज्ञान कोणत्याही युगातील असो त्याची माहिती प्राध्यापक व विद्यार्थ्यांना मिळालीच पाहिजे . त्यांच्या ज्ञानात भर पडण्यासाठी अशा कार्यक्रमाची आवश्यकताच असते .आपल्याला जगातील बदलत्या तंत्रज्ञानावर विश्वास ठेवावाच लागेल. उपस्थिता पैकी काही विद्यार्थी उद्याचे प्राध्यापक देखील असू शकतील , प्राध्यापक व विद्यार्थ्यांना कृत्रिम बुद्धिमत्ता , साधने व त्याची उपयुक्तता याची सर्विस्तर माहिती मिळावी यासाठीच कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असून प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी संशोधन करण्याचे आवाहन करून, कृत्रिम बुद्धिमत्ता रोबोटसचा वापर दैनंदिन जीवनात कसा होतो, याचे व्हिडिओद्वारे माहितीचे सादरीकरण यावेळी करण्यात आले.
कार्यशाळेचे सूत्रसंचालन प्रा. रसिका पाटील यांनी केले. स्वागतपर मनोगत उपप्राचार्या डॉ. क्षितिजा गांधी यांनी केले तर आभार प्रा. जयश्री कांबळे यांनी मानले .











